

जळगाव : पुढारी विशेष
संपत्ती आणि विम्याच्या पैशांच्या हव्यासापोटी सख्ख्या भावजईची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या करणाऱ्या नराधम दिराला जळगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. दीपक लोटन सोनार असे या नराधम आरोपीचे नाव असून, जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पिंप्राळा परिसरातील मयुरी कॉलनीत २१ मे २०२१ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. मयत योगिता सोनार यांचे पती मुकेश सोनार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेले विम्याचे पैसे तसेच घर आणि प्लॉटच्या कागदपत्रांवरून आरोपी दीपक सोनार, त्याची आई प्रमिला व नातेवाईक योगिता यांना सतत त्रास देत होते.
घटनेच्या दिवशी आरोपी दीपक घराच्या कागदपत्रांशी छेडछाड करत असताना योगिता यांनी जाब विचारताच दीपकने दिवाणाखाली लपवून ठेवलेली कुऱ्हाड काढून लहान मुलासमोरच योगिताच्या डोक्यावर प्राणघातक वार केले.
सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात साक्षीदार मुलगा आर्यन, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासाधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी केलेला मांडलेला भक्कम पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दीपक सोनारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आईवर हल्ला होत असताना योगिता यांचा लहान मुलगा आर्यन याने अत्यंत धाडसाने आरोपीच्या चेहऱ्याला पकडत त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून बाजूला फेकून दिली होती. यानंतर त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपासाधिकारी अनिल बडगुजर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.