

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंप्राळा हुडको परिसरात भरवस्तीत अवैधरित्या गॅस सिलिंडर रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती SDPO नितीन गणापुरे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तातडीने विशेष पथक तयार करून सर्च ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गुप्तपणे सापळा रचत संबंधित ठिकाणी अचानक छापे टाकले.
पहिल्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ५ घरगुती गॅस सिलिंडर आणि रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारा १ इलेक्ट्रिक पंप जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या ठिकाणी ७ गॅस सिलिंडर आणि १ पंप आढळून आला. याशिवाय, गॅस मोजण्यासाठी वापरण्यात येणारे दोन वजन काटेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
भरवस्तीत सुरू असलेला हा अत्यंत धोकादायक प्रकार वेळेत उघडकीस आणत पोलिसांनी संभाव्य मोठा अपघात टाळला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गॅस व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई SDPO नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार, रविंद्र जाधव, रविंद्र मोतिराया आणि अमोल ठाकूर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.