

Anti Corruption Bureau action in Raver
जळगाव : दारूबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी आणि दारूचा धंदा सुरळीत चालू ठेवू देण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खासगी चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल आणि उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांच्या वडिलांवर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ प्रमाणे कारवाई न करण्यासाठी, तसेच तक्रारदाराचा दारूचा धंदा यापुढेही विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विजय भास्कर पाटील याने पैशांची मागणी केली होती.
पाटील याने प्रति महिना १,५०० रुपये याप्रमाणे १२ महिन्यांचे एकूण १८,००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती यातील १०,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याप्रकरणी १७ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी सिद्ध झाली.
त्यानुसार आज १८ डिसेंबर रोजी रावेर परिसरात सापळा रचण्यात आला. विजय पाटील याच्या सांगण्यावरून त्याचा खाजगी चालक भास्कर रमेश चंदनकर याने १०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने विजय भास्कर पाटील (वय ५१): दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रावेर. (मूळ रा. उहा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) .
भास्कर रमेश चंदनकर (वय ४३), खाजगी चालक (रा. खानापूर, ता. रावेर) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.