

जळगाव : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे जैन हिल्स येथे 'कृषी महोत्सव २०२५-२६' चे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अभंग जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के. गौतम देसर्डा, बी.डी. जडे, अजय काळे, संजय सोनजे यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शेतीतील नव तंत्रज्ञानाचा अभ्यास व्हावा, या दृष्टीने गेल्या तीन वर्षांपासून 'कृषी महोत्सव' आयोजन केले जात आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचनाचे (ठिबक) महत्त्व, पाण्याचे योग्य नियोजन, त्यातून उत्पादनात होणारी वाढ यावर विशेष भर देण्यात आला आहे. 'अधिक उत्पादन, अधिक नफा' असे सूत्र आहे. ‘विज्ञान अन् तंत्रज्ञानाच्या जोडीने शेतीला नवी दिशा देणारा हा महोत्सव’ आहे. यामुळे ‘सायन्स-टेक@वर्क’ ही या वर्षाची संकल्पना आहे. महिनाभराच्या कालावधीत हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेतीचे जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे.
जैन हिल्सवर उभे केलेले विविध पिकांचे प्रत्यक्ष प्रयोग आणि शास्त्रोक्त शेती पद्धतींचे प्रात्यक्षिके येथे बघायला मिळणार आहेत. "बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही" हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून, शेतकऱ्यांना केवळ माहिती न देता तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे. कृषी महोत्सव म्हणजे प्रगतीचे नवे साधन ठरेल, त्यामुळे शेतकरी बांधवांनी यासाठी अवश्य यावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.