

JMC Election News
जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रस्थापितांनी आपल्या वारसदारांना आणि निकटवर्तीयांना संधी दिली आहे. राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार सुरेश भोळे आणि आमदार डॉ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पुत्रांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे, आजी-माजी महापौरांचे नातेवाईक आणि मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील नशीब आजमावत आहेत.
विद्यमान आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी आपली राजकीय पकड सिद्ध करत मुलगा विशाल सुरेश भोळे (प्रभाग क्र. ७ क) याची बिनविरोध निवड निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे आमदार डॉ. चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (प्रभाग १८ अ) हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, डॉ. सोनवणे यांची कन्या डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे या प्रभाग ११ अ मधून नशीब आजमावत असून त्यांच्या लढतीकडे लक्ष लागून आहे.
शिंदे गटाने माजी महापौर ललित कोल्हे यांच्या कुटुंबावर मोठा विश्वास दाखवला आहे. कोल्हे कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यात स्वतः ललित विजय कोल्हे (प्रभाग १४ क), त्यांच्या मातोश्री माजी महापौर सिंधू विजय कोल्हे (प्रभाग १४ ड) आणि मुलगा पियुष ललित कोल्हे (प्रभाग ४ ड) यांचा समावेश असून, तिघेही शिंदे सेनेच्या धनुष्यबाणावर लढत आहेत.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू, स्वीय सहाय्यक व आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख यांना भाजपने प्रभाग १५ ब मधून उमेदवारी दिली आहे. महाजनांच्या या ‘खास’ माणसाच्या एन्ट्रीने या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरली आहे.
प्रभाग ५ ड: उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातून भाजपमध्ये आलेले माजी महापौर लड्डा नितीन बालमुकुंद आणि याच्या अगदी उलट म्हणजे भाजपमधून UBT गटात गेलेले गांधी पियुष संजयकुमार यांच्यात सरळ आणि अटीतटीची लढत होत आहे.
प्रभाग १४: UBT गटातून निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेले सुनील सुपडू महाजन (१४ अ) आणि जयश्री सुनील महाजन (१४ ब) या दाम्पत्याला भाजपने संधी दिली आहे.
प्रभाग ५ अ: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासमोर अपक्ष उमेदवार पियुष नरेंद्र पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तसेच UBT गटाचे प्रवीण माळी यांनीही शड्डू ठोकल्याने येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे.
UBT गटाचे शिलेदार: जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील (१० ड) आणि उज्वला कुलभूषण पाटील (८ अ) हे पती-पत्नी वेगवेगळ्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत.
माजी महापौर भारती सोनवणे व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचे पुत्र कल्पेश कैलास सोनवणे (४ क) आणि प्रतीक्षा कैलास सोनवणे (३ ब) हे भाजपकडून मैदानात आहेत.
भाजप जिल्हाप्रमुख भाजपचे महानगर जिल्हाप्रमुख सूर्यवंशी दीपक प्रभाकर हे प्रभाग ६ ड मधून निवडणूक लढवत आहेत.
जळगाव महापालिकेचे हे रणांगण आता केवळ पक्षांपुरते मर्यादित न राहता ‘वारसदार’ आणि ‘स्वीय सहाय्यकां’च्या प्रतिष्ठेचे बनले आहे. यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.