

Mahayuti Roadshow Jalgaon
जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (दि.६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य 'रोड शो' आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या दौऱ्याच्या निमित्ताने जळगावच्या प्रमुख रस्त्यांचे रूपडे अक्षरशः पालटले असून, वर्षानुवर्षे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यांनी जणू मोकळा श्वास घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा व महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. रोड शोच्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या आणि नाश्त्याच्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत. दुकानांसमोर उभी केलेली वाहने आणि वाढीव ओटे बाजूला करण्यात आले आहेत. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ज्या पाणपोई हटवण्याचे धाडस पालिका कर्मचारी कधीही दाखवू शकले नव्हते, त्याही आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे तातडीने हटवण्यात आल्या आहेत.
नेहमी गर्दी आणि अतिक्रमणामुळे १० फुटांचा वाटणारा रस्ता आज चक्क १५ ते २० फुटांचा झाल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होणारा हा रोड शो नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे जी.एस. ग्राऊंडपर्यंत जाणार आहे. या संपूर्ण मार्गावरील खानदेश मिल कॉम्प्लेक्सजवळील लहान-मोठ्या व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली आहेत.
प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता पाहून जळगावकर नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. "जे काम वर्षानुवर्षे होऊ शकले नाही, ते मुख्यमंत्र्यांच्या एका दौऱ्यामुळे काही तासांत झाले," अशी चर्चा शहरात रंगली आहे. अतिक्रमणाची कात टाकल्यामुळे रस्ते रुंद आणि मोकळे दिसत असून, हे चित्र कायम राहावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.