

जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर, आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री जळगावच्या मैदानात उतरणार आहेत. मंगळवारी (दि. ६ जानेवारी) होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भव्य 'रोड शो'मुळे जळगावातील राजकीय वातावरण पूर्णपणे 'हाय व्होल्टेज' झाले आहे.
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या महत्त्वाच्या मार्गांवरून हा रोड शो मार्गक्रमण करणार आहे:
प्रारंभ: नेहरू चौक
प्रमुख मार्ग: लालबहादूर शास्त्री टॉवर — चित्रा चौक — गोलाणी मार्केट
समारोप: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
या भव्य रोड शोनंतर मुख्यमंत्री शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महायुतीची निवडणुकीतील पुढील रणनीती जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने जळगाव शहर सध्या छावणीचे स्वरूप धारण करत आहे. प्रशासकीय पातळीवर प्रचंड हालचाली सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने संपूर्ण मार्गाची तांत्रिक पाहणी केली असून, ठिकठिकाणी फिक्स पॉइंट आणि बॅरिकेडिंग लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सीआयडी (CID), एसआयडी (SID) यांसारख्या गुप्तचर विभागांसह सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सुरक्षेचा आढावा घेत आहेत. रोड शोदरम्यान शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
१२ जागा आधीच बिनविरोध निवडून आणल्यानंतर, उर्वरित जागांवरही निर्भेळ यश मिळवण्यासाठी महायुतीने मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आपला 'हुकुमी एक्का' बाहेर काढला आहे. या रोड शोमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्सुकता शिगेला: जळगावचे नागरिक या शक्तीप्रदर्शनाला कसा प्रतिसाद देतात आणि मुख्यमंत्री जळगावकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काय बोलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.