

जळगाव : मुंबई वेधशाळा आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ४८ तासांत अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
वेधशाळेच्या अंदाजानुसार, ३० जुलै रोजी जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट कायम असून ३१ जुलै रोजी 'यलो अलर्ट' राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने पूरप्रवण क्षेत्रे, धरणे आणि नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
शासकीय यंत्रणा अलर्ट: सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालायात उपस्थित राहून सतर्क राहावे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज: बचाव साहित्य, मनुष्यबळ आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याचे आदेश.
समन्वय व खबरदारी: वीज, पाणी, आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामपंचायत आणि नगरपालिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश.
घराबाहेर पडणे टाळा: अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर पडू नये.
पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नका: नदी, नाले, पूल, धबधबे आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहाजवळ जाणे पूर्णपणे टाळावे.
झाडांखाली आश्रय घेऊ नका: विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या मैदानावर किंवा झाडांखाली उभे राहू नये.
अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवा: हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा:
टोल फ्री क्रमांक: १०७७ (1077)
फोन नंबर: ०२५७-२२१७१९३ / ०२५७-२२२३१८०
व्हॉट्सॲप हेल्पलाइन: ९३७३७८९०६४