

जळगाव : जिल्ह्यातील ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याची नासाडी झाली असून पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव विमानतळावर शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा त्यांच्यासोबत भावनिक संवाद साधला, ही चर्चा अवघ्या 10 मिनिटांपर्यंत झाली.
शनिवार (दि.27) रोजी मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता विमानाने जळगाव विमानतळावर आले. पूरग्रस्त शेतकरी व स्थानिक रहिवाशांची त्यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांसह पूरग्रस्त बाधित नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात येईल. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर धुळ्याकडे रवाना झाले.
दरम्यान, प्रशासनाकडून शेतकरी व पूरग्रस्तांसाठी तातडीने नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र ही न्याहारी पूरग्रस्त शेतकऱ्यांना न मिळता उपस्थित उपाशी असलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यावर ताव मारला. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली व्यवस्था कार्यकर्त्यांसाठी होती का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
पूरामुळे पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
पाटील सतीश, शिंदाड (पाचोरा)
अतिवृष्टीमुळे राहते घर पडले, निवारा गेला शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोंडातला घासच या आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. आता राहायला घर नसल्याने तीन दिवस शाळेत राहावे लागले. पण भविष्यातील चिंता सतावत आहे. घरातील लेकरबाळांना घेऊन कुठे जायचे ?
कमलाबाई अहिरे, पाचोरा
मुसळधार पाऊस आला आणि सगळचं घेऊन गेला. राहण्यासाठी असलेलं एक घर होतं तेही या पावसामुळे पडले, साहेब, खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे. खायला अन्न नाही अन् राहायला निवारा नाही, अशी परिस्थिती आमच्यावर आली आहे.
तुकाबाई कोळी, नेरी (ता. जामनेर)
पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडली व्यथा
मुख्यमंत्र्यांनी सर्व पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना भावनिक आधार दिला तसेच तातडीने त्यांच्या समस्या सोडवण्यासंबधीत आदेश अधिकाऱ्यांना दिले, संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना देत त्वरीत कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.