

MSEDCL Jalgaon
जळगाव : शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून मुक्त करून त्यांच्या आयुष्यात उजेड आणणे ही शासनाची ठाम भूमिका आहे. 'दिवसा वीज' ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या जीवनात नवा विश्वास निर्माण करणारी संकल्पना आहे. शेतकऱ्यांची गरज जिथे असेल, तिथे शासनाची विकासकामे पोहोचलीच पाहिजेत. उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) निधीतून नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
चिंचोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ एमव्हीए अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आधुनिक, सक्षम आणि विश्वासार्ह वीज व्यवस्था ही शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचा भक्कम पाया आहे. जळगाव जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेतीचे नियोजन सुलभ झाले असून उत्पादनक्षमतेतही वाढ झाली आहे. चिंचोली परिसरात उन्हाळ्यात वाढलेल्या वीजभारामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी आणि त्यांच्या पथकाने हे काम मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले आहे. त्यामुळे चिंचोली, उमाळा, धानोरी, धानवड, देव्हारी, कुसुंबा आदी सात गावांतील शेतकरी, ग्रामस्थ तसेच औद्योगिक ग्राहकांना अधिक सक्षम, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.
गेल्या पाच वर्षांत डीपीडीसीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी विक्रमी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देत अशा लोकाभिमुख विकासकामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्राला अखंड, दर्जेदार व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. वीजपुरवठ्याबाबत उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांनी केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी तालुक्यात मंजूर विविध वीज विकासकामांची माहिती दिली. अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना होणाऱ्या लाभाची माहिती देत परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत आणि विश्वासार्ह होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी मानले.
यावेळी परिसरातील सरपंच तसेच जळगाव ग्रामीण औद्योगिक असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील वीज सुविधा बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले.
महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, जळगाव ग्रामीण औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लड्डा, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, राजू पाटील, देविदास कोळी, संजय घुगे, प्रवीण पाटील, सरपंच मिलिंद लाड, शेतकरी संघाचे ब्रिजलाल पाटील, योगेश सोनवणे, मनोहर पाटील, जितेंद्र पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे, कनिष्ठ अभियंता डिगंबर सावदेकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.