Jalgaon Mayor Election| जळगावात पहिला ‘पॅटर्न’ यशस्वी: महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी बिनविरोध

सुवर्णनगरीत महायुतीला दणदणीत बहुमत
Jalgaon Municipal Corporation Politics
Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Municipal Corporation Politics

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. महायुतीकडून महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ‘जीएम फाउंडेशन’ येथे झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली.

राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या महानगरपालिकेत महापौर व उपमहापौरपदाची निवड बिनविरोध होत असल्याने ही घटना विशेष ठरली आहे. या घडामोडीमुळे महायुतीच्या संघटनात्मक ताकदीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Jalgaon Municipal Corporation Politics
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगावात दिग्गजांची मुलांना भरभरुन मत'दान', एकाच कुटुंबातील आजी-मुलगा- नातू विजयी

जळगावात राज्यातील पहिला ‘पॅटर्न’ यशस्वी

जळगाव महानगरपालिकेच्या ७५ पैकी तब्बल ७० जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) यांचे नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रचंड बहुमतामुळे विरोधकांची भूमिका केवळ औपचारिक ठरली आहे. याच संख्याबळाच्या जोरावर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी महापौर-उपमहापौर निवडीचा पेच अत्यंत कौशल्याने सोडवला. ही निवड आगामी १० महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे.

अर्ज दाखल, औपचारिक घोषणा ६ तारखेला

बैठकीनंतर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी महानगरपालिकेत आपले अर्ज दाखल केले. विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवड बिनविरोध होणे जवळपास निश्चित झाले असून, येत्या ६ तारखेला अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Jalgaon Municipal Corporation Politics
Jalgaon Municipal Corporation : माजी महापौरांची मुलेही निवडणूक लढवणार ?

‘सर्वांनी एकत्रितपणे काम करावे’ – गुलाबराव पाटील

बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महायुतीचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित झाले असून, आता सर्व नगरसेवकांनी मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावे.

‘सर्वांना समान संधी’ – गिरीश महाजन

नगरसेवकांना संबोधित करताना गिरीश महाजन म्हणाले, “राज्यात पहिल्यांदाच जळगावात अशा प्रकारची बिनविरोध निवड होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाचा सन्मान राखला जाईल. महापौर व उपमहापौरपदासह स्थायी समिती, विषय समित्या आणि इतर महत्त्वाच्या पदांवर सर्वांना समान संधी दिली जाईल.”या आश्वासनामुळे नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Jalgaon Municipal Corporation Politics
Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेतील लाचखोर लिपीकाला रंगेहाथ अटक

बलाबल स्पष्ट

महायुतीकडे ७० जागांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने मनपातील सत्तेची सर्व सूत्रे आता त्यांच्या हाती आली आहेत. शहराचा विकास, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि महायुतीची पकड अधिक मजबूत करणे, हे नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांसमोरचे प्रमुख आव्हान असणार आहे.

विजयाचा जल्लोष

नावांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. “जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सर्व नगरसेवक एकदिलाने काम करतील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news