

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि.19 ) दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर महानगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार एसीबीने सापळा रचला होता. १९ ऑगस्ट रोजी दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान, महापालिकेच्या १७ मजली इमारतीतील आरोग्य विभागात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लिपीकाला एसीबीने रंगेहाथ पकडले.
कारवाई अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आली असून अटक झालेल्या लिपीकाची कसून चौकशी सुरू आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.