

Chalisgaon Election Result 2025: नगरपालिका निवडणुकीच्या निकालाची अधिकृत घोषणा होण्याआधीच चाळीसगाव शहरात राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच शहरात झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
चाळीसगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाच्या शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. “लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा” अशा आशयाचे हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, मतमोजणी पूर्ण होण्याआधीच ही बॅनरबाजी करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास या बॅनरमधून दिसून येत आहे. शहरातील प्रमुख चौकात लावलेल्या बॅनरमुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा निकालानंतर कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी सतर्क असून, शहरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिकृत चित्र स्पष्ट होणार असले तरी, निकालापूर्वीच झळकलेल्या विजयाच्या बॅनरमुळे चाळीसगावमधील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं चित्र आहे.