Jalgaon Amalner killed case|अमळनेर वाळू माफिया हत्या प्रकरण: छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे उपोषण; तीन मुख्य आरोपींना सांगलीतून अटक

अमळनेर वाळू माफिया हत्या प्रकरण: छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे उपोषण; तीन मुख्य आरोपींना सांगलीतून अटक
Jalgaon Amalner killed case
Jalgaon Amalner killed case
Published on: 
Updated on: 

जळगाव: अमळनेर तालुक्यातील नांद्री परिसरात अवैध वाळू चोरीला विरोध करणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्या शरद रतन पाटील (रा. नगाव बुद्रुक, ता. अमळनेर) यांची डंपरखाली चिरडून अमानवी हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने आता चांगलेच रौद्ररूप धारण केले आहे. या हत्येला वाळू माफियांना पाठीशी घालणारे अमळनेरचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केला आहे.

प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करून सहआरोपी करावे आणि मुख्य सूत्रधार किरण गोसावी व अनिल पाटील यांच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आता यातील तीन आरोपींना सांगली येथून अटक करण्यात आली आहे.

या मागणीसाठी ब्रिगेडच्या वतीने आज, शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे व उपोषण आंदोलन केले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः जातीने खाली येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

नांद्री परिसरात दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी डंपर क्रमांक (HR-37D-8957) व दोन विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज व वाळू चोरी सुरू होती. जागृत नागरिकांनी ही वाहने अडवून तलाठी व पंचासमक्ष पंचनामे केले आणि पोलिसांत तक्रार दिली. या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची विनंती ग्रामस्थांनी अमळनेरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी ती धुडकावून लावली. त्यानंतर स्थानिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाळू माफियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ डंपर व ट्रॅक्टर जप्त करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले. मात्र, वाळू माफियांशी असलेल्या हितसंबंधांमुळे प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धाब्यावर बसवून कोणतीही कारवाई केली नाही.

प्रशासनाच्या या अभयामुळे वाळू माफियांची हिंमत वाढली आणि त्यांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी वाळू चोरीला विरोध करणारे साक्षीदार शरद रतन पाटील यांना त्याच डंपरखाली (HR-37D-8957) चिरडून ठार मारले. "प्रशासन आमच्या खिशात आहे," असाच संदेश या घटनेतून माफियांनी दिल्याचा संताप ब्रिगेडने व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या:

अमळनेरच्या जबाबदार प्रांताधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा.

हत्येचे मुख्य सूत्रधार किरण गोसावी व अनिल पाटील यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करावी.

मयत शरद पाटील यांच्या कुटुंबीयांना गौण खनिज निधीतून ५० लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी व ही रक्कम आरोपींकडून व्याजासह वसूल करावी.

शरद पाटील यांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवून विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.

Jalgaon Amalner killed case
Gold rate|जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात दरवाढीचा झटका; २४ कॅरेट सोने पुन्हा १ लाख २६ हजारांच्या पार

उपोषणाला यांची होती उपस्थिती-

आजच्या या एकदिवसीय उपोषण आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख किरण एस. बोरसे यांनी केले. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ. धनंजय शिंदे, नंदूभाऊ रायगडे, डॉ. गणेश, विकास पाटील, महेश पाटील, गोपाल पाटील, प्रविण गोसावी, कैलास, राहुल यांच्यासह नगाव बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ व भागणीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मागण्या मान्य न झाल्यास जनहितार्थ बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाही पाठवण्यात आली आहे.

Jalgaon Amalner killed case
Jalgaon Rathotsav : जय श्रीराम’च्या गजरात दुमदुमले जळगाव ; १५४ वा रथोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.