

जळगाव : कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर शनिवारी जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ व्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. संस्थानचे विद्यमान पाचवे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता महापूजन झाल्यानंतर, दुपारी १२.४० वाजता हजारो रामभक्तांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘बोल बजरंगबली की जय’च्या गगनभेदी जयघोषात रथाचे दोरखंड ओढले. विशेष म्हणजे, यंदा रथाच्या हालचालींवर अचूक नियंत्रण ठेवण्यासाठी रथाला 'जीपीएस' यंत्रणा बसवून परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली होती.
पहाटेपासूनच श्रीराम मंदिरात काकडा आरती व अभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली. जुने जळगाव परिसरातील गल्लीबोळ भगव्या पताका, रांगोळ्या आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. फुलांच्या माळा, ऊस आणि नारळाच्या तोरणांनी सजलेला भव्य लाकडी रथ भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. रथाच्या नियंत्रणासाठी मोगरीधारकांचे पथक सज्ज होते. मिरवणुकीच्या अग्रभागी श्री संत मुक्ताबाईंच्या पादुकांची पालखी, भजनी मंडळे, सनई-चौघडा आणि ढोल-ताशांच्या दणदणाटाने वातावरण भारावून गेले होते. सजीव आरास, शुभ्र अश्वांचे नृत्य आणि चिमुकल्यांचे अडीच ते तीन फुटी छोटे रथ या सोहळ्याची शोभा वाढवत होते.
दिग्गजांची हजेरी आणि भक्तीचा महापूर
या सोहळ्याला प.पू. श्री नृसिंह विजयेन्द्र सरस्वती (विठ्ठल आश्रम, मध्यप्रदेश) यांच्यासह जिल्ह्याचे सर्व राजकीय व प्रशासकीय नेतृत्व एकवटले होते. यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, आ. राजुमामा भोळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, उद्योगपती अशोक जैन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त जीवने आणि तहसीलदार गायकवाड यांचा समावेश होता.
तसेच डॉ. केतकी पाटील, बंडुदादा काळे, रविंद्र माळी, भालचंद्र चौधरी, नितीन लढा, महेंद्र पाटील, श्रीकांत खरोड, विष्णू भंगाळे, ललित चौधरी, ललित कोल्हे, डॉ. विरेन खडके, लताताई भोईटे, विरेंद्र भोईटे, अशोक वाघ, मुकुंद मेटकर, उदय भालेराव, किशोर सूर्यवंशी, गिरीश कुळकर्णी, संदिप कासार, अशोक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थानचे विश्वस्त डॉ. भरतदादा अमळकर, भालचंद्र पाटील, शिवाजीराव भोईटे, अॅड. सुशील अत्रे, विजय जोशी, जयवर्धन नेवे आणि रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी नियोजनाची धुरा सांभाळली.
रथमार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या अन् ‘जीपीएस’चे नियंत्रण
श्रीराम मंदिरातून निघालेला हा रथ भोईटे गढी, आंबेडकर नगर, तेली चौक, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर, मरिमाता मंदिर, भिलपुरा आणि बालाजी मंदिरमार्गे पुन्हा रथ चौकात विसावला. संपूर्ण मार्गावर महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, घराघरांतून होणारी आरती आणि फुलांच्या उधळणीने रथाचे स्वागत झाले. भक्तांना केळी व नारळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. रथोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रथावर बसविलेल्या 'जीपीएस' यंत्रणेद्वारे संस्थानला रथाचे 'लाइव्ह लोकेशन' मिळत होते.