जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक

गिरीश महाजन,www.pudhari.news
गिरीश महाजन,www.pudhari.news
Published on
Updated on

जळगाव : चेतन चौधरी 

जिल्ह्यात आजी-माजी मंत्र्यांसह नेते मंडळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे मात्र कुपोषणासारख्या गंभीर आजाराचे प्रस्थ वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२९३ बालके कुपोषणाच्या तावडीत सापडली असून, ३० हजारांहून अधिक बालके कमी वजनाची आढळल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात राजकारण तापले आहे. दिग्गज नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या विकासाच्या गप्पा रंगत असताना जिल्ह्यात कुपोषणाच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अजूनही कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चूनही योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचतच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गर्भवती मातांना गरजेइतका आहार मिळत नसल्याने जिल्ह्यातील कुपोषणाची संख्या वाढली आहे. अशा बालकांना जास्तीत जास्त पोषक अन्न मिळण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सातपुड्यातील कुपोषण घटले…

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागांकडून जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबतचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात सौम्य, मध्यम व अतिकुपोषित या तीन वर्गीकरणात बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून सातपुड्यात कुपोषणाची समस्या वाढली होती. सातपुडा लगतच्या चोपडा, यावल आणि रावेर या तालुक्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक होते. मात्र, सध्याच्या सर्वेक्षणातील आकडेवारीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सातपुडा लगतच्या तालुक्यांपेक्षा जामनेर, चाळीसगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात गंभीर स्थिती

राज्याचे ग्रामविकासमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात सर्वाधिक कुपोषित मुलांची संख्या असून, राजकीय आरोपांच्या फैरींपेक्षा या प्रश्नाकडे मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जामनेर तालुक्यात १८४ बालके कुपोषित आढळली आहेत, तर ४ हजांराहून अधिक बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत.

अशी आहे आकडेवारी…

जिल्ह्यात एकूण २ लाख ९८ हजार ५७० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १ हजार २९३ बालके अतितीव्र कुपोषित आहेत. ६ हजार ७७७ बालके मध्यम कुपोषित, तर ३० हजार ७९५ बालके कमी वजनाची आहेत. त्यात अमळनेर तालुक्यात – ७१, भडगाव – ६५, भुसावळ – ६२, बोदवड – ४७, चोपडा – ९०, चाळीसगाव – १३५, धरणगाव – ६७, एरंडोल – ५६, जळगाव – ६८, जामनेर – १८४, मुक्ताईनगर – ५४, पाचोरा – १५३, पारोळा – ६१, यावल – ८६, रावेर – ९४ बालके कुपोषित आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news