जळगाव : राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

जळगाव : जनसंवाद यात्रेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी
जळगाव : जनसंवाद यात्रेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीकेचे शस्त्र उगारले जात आहे. जिल्ह्यात नुकतीच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी हेदेखील जळगाव दौऱ्यावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या आयोजित जनसंवाद यात्रेदरम्यान बोदवड तालुक्यातील शेलवड येथील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, त्या दिवशी हे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

लहान मुलांच्या तोंडीदेखील ५० खोके…

यावेळी अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरही टीका केली. शिंदे गटाचे आमदार म्हणतात, आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तर शिंगावर घेऊ. मग, आता पोळा सणात बैलांवरही लिहिले होते, '५० खोके, एकदम ओके', 'अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके' असे म्हटले. लहान लहान मुलेदेखील म्हणतात, पन्नास खोके एकदम ओके. त्या खोक्यात बिस्किट असू शकतात, इंजेक्शन असतात. तुम्हाला का एवढे लागले? असा टोला मिटकरी यांनी यावेळी लगावला होता.

पंकजा मुंडेंनीदेखील राष्ट्रवादीत यावे…

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपचा पक्ष वाढला. मात्र, त्यांच्यासोबत सुडाचे राजकारण केले जात आहे. खडसेकन्येचा पराभव झाल्याचे रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. मात्र, पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला हवे. १२ आमदारांची यादी राज्यपाल लवकरच करतील. १२ आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नसल्याने पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटले जातात ते दिसत आहे, असेही मिटकरी म्हणाले. एक प्रकारे रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या तसेच पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे, असा सल्ला मिटकरी यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news