पुणे : महामार्गावर खड्ड्यांमुळे वाढले अपघात | पुढारी

पुणे : महामार्गावर खड्ड्यांमुळे वाढले अपघात

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : हजारो कोटी रुपये खर्चून पुणे-नाशिक महामार्ग तयार करण्यात आला. मात्र, या महामार्गावरील खड्डे आता अपघातांना निमंत्रण देत आहेत. वाढत्या अपघातांमुळे पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न चर्चिला जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपासचे काम अपूर्ण असल्याने सध्या नाशिकच्या दिशेने जाताना अवघा साडेतीन किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संतवाडी फाटा येथे पुण्याकडे जाणारा रस्ता खचला असून, पडलेले खड्डे सतत बुजविण्याचा महामार्ग प्रशासनाचा प्रयत्न हास्यास्पद ठरत आहे.

पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दिवसांत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. शनिवारी संतवाडीफाटा ते आळेखिंड अशा एक किलोमीटरच्या दरम्यान चार छोटे-मोठे अपघात झाले. एक कार नाशिककडून पुण्याकडे जात होती. ती संतवाडी फाट्याजवळ आली असता खड्डे वाचविण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्ता कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली. सदर कार नाशिककडे जाणार्‍या कारवर आदळली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, वाहनातील एअरबॅग उघडल्याने दोन्ही वाहनचालकांचा जीव वाचला. यामुळे नाशिकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. अपघात टाळण्यासाठी या मागार्वरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Back to top button