जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; पालिका निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; पालिका निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या विरोधात अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या याचिकेवर‎ न्या. अरुण‎ पेडणेकर यांनी निकाल दिला.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिलेल्या सहा वर्षांसाठीची‎ अपात्रता न्यायालयाने रद्द केली आहे. केवळ‎ एका टर्मसाठी अपात्रता करण्यात‎ आली. मात्र मुळातच टर्मचा‎ कालावधी संपल्याने  अपात्र नगरसेवकांना पालिकेची‎ पुढील निवडणूक लढता येणार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.‎ पालिकेच्या 2016 च्या‎ निवडणुकीत लोकनियुक्त‎ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह‎ नऊ नगरसेवक भाजपच्या‎ चिन्हावर निवडून आले होते.‎ मात्र त्यांनी एकनाथ खडसेंसोबत भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता.

या नगरसेवकांचा समावेश
याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रतेची कारवाईबाबत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर जिल्हाधिकार्‍यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण देविदास भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलेजा नारखेडे यांना 18 डिसेंबरपासून 2021 पासून पुढील सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले होते. यानंतर अपिलादरम्यान नगरविकास विभागानेही जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला होता.

निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा…
अपात्र नगरसेवकांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात अपील केले. न्या.अरुण आर.पेडणेकर यांनी याचिकेवर निकाल देत नगरविकास विभागाचा आदेश रद्द ठरवत संबंधिताना केवळ 2021 पर्यंत अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आगामी काळात या नगरसेवकांना आता पालिका निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. अपात्र नगरसेवकांकडून अ‍ॅड.आर.आर.देशमुख तर भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्या वतीने अ‍ॅड.होन यांनी काम पाहिले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news