बेलसर : रब्बी हंगाम धोक्यात; धान्य काळवंडण्याबरोबरच बागांवरही रोगराईची शक्यता | पुढारी

बेलसर : रब्बी हंगाम धोक्यात; धान्य काळवंडण्याबरोबरच बागांवरही रोगराईची शक्यता

बेलसर; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात मंगळवारी (दि. 7) काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच अवेळी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांची धांदल उडाली. बेलसर, वाघापूर, पारगाव, जेजुरी, सासवड आणि इतर परिसरात पावसाच्या हलक्या सरी सकाळी कोसळल्या. तालुक्यात बहुतांश ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा; त्यासोबतच इतर भाजीपाला पिकांची काढणी सुरू आहे. परंतु, अवेळी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर टाकली आहे.

तालुक्यातील जवळपास 80 टक्के क्षेत्रावरील गहू काढणीस आला आहे. त्यामुळे अवकाळीने शेतकर्‍यांची गहू काढण्याची लगबग सुरू आहे. काढणी न झालेल्या कांद्यासह गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. डाळिंबावर रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून कळ्या गळण्याचे प्रमाण वाढणार आहे. शेतकर्‍यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. अवेळी पाऊस व सोसाट्याच्या वार्‍यामुळे काढणीस आलेला गहू भुईसपाट होऊन धान्य काळे पडणार आहे. त्याची गुणवत्ता खराब होणार आहे.

गुरुवारी पुन्हा पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार तालुक्यात दि. 9 मार्च रोजीही पावसाची शक्यता आहे. पाच दिवसांत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

Back to top button