नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ

नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ दिसून येत आहे. वनविभागाच्या राखीव क्षेत्रावर या प्रकल्पांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार दक्षता विभागाकडून उघडकीस आणला जात आहे. वनविभागानंतर भूमाफियांनी वनविकास महामंडळ अर्थात 'एफडीसीएम'च्या राखीव वनक्षेत्राकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. त्यामुळे दक्षता विभागाकडून 'एफडीसीएम'ला अलर्ट करण्यात आले असून, त्यांच्या वनक्षेत्रालगत उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या पाहणीसह सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत.

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी आणि पांझण येथील तब्बल ४०० एकर वनजमिनीवर बेकायदा उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प सील केल्यानंतर वन दक्षता पथकाने नाशिक वनवृत्तातील इतर सौरऊर्जा प्रकल्पांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अर्थात 'महाजेनको'कडून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची माहिती मागविण्यात आली आहे. बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पाचे लोण संपूर्ण नाशिक वनवृत्तात पसरल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

दिंडोरी तालुक्यातील पिंगळवाडी येथील दिल्लीस्थित ग्रुपच्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबत मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर दक्षता विभागाकडून चौकशीचे काम सुरू आहे. हा प्रकल्प प्रादेशिक आणि एफडीसीएमच्या वनक्षेत्रालगत असल्याने त्यासाठी अतिक्रमण होण्याची दाट चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिंडोरी प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी आणि एफडीसीएमचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल वाघ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह सर्वेक्षण केले. त्यात सौरऊर्जा प्रकल्प वनविभाग अथवा एफडीसीएमच्या जागेत नसल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

अवघ्या २५० मीटरवर प्रकल्प

दिंडोरीतील पिंगळवाडी येथील दिल्लीस्थित ग्रुपचा सौरऊर्जा प्रकल्प वनक्षेत्रापासून अवघ्या २५० मीटरवर आहे. या ठिकाणी संबंधित कंपनीकडून अतिक्रमण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रादेशिक व एफडीसीएमच्या सर्वेक्षणानंतर दक्षता पथकाकडून पुन्हा या वनक्षेत्राबाबत शहानिशा केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणीसह कागदपत्रांची 'दक्षता'कडून पडताळणी होणार असल्याचे समजते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news