जखमी रोशनी शिंदेला हलवले लीलावती रुग्णालयात, रोशनीवर गुन्हा दाखल | पुढारी

जखमी रोशनी शिंदेला हलवले लीलावती रुग्णालयात, रोशनीवर गुन्हा दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून शिंदे गटाकडून मारहाण झालेली ठाकरे गटाची युवती कार्यकर्ती रोशनी शिंदे हिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची पार्श्वभूमी आणि तिला आलेला तापावरील उपचारामुळे पुढे काही समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून सर्व वैद्यकीय तपासण्या आणि उपचारासाठी रोशनी हिला मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी दिली. दरम्यान गुन्हा दाखल करण्यासाठी आज दुपारी ठाणे पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकण्यासाठी महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले. त्यात सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये पोस्ट युद्ध सुरू झाले आहेत. त्यात ठाकरे गटाची युवती कार्यकर्ती रोशनी शिंदे ही देखील आघाडीवर होती. गेल्या नऊ महिन्यांपासून रोशनी सतत पोस्ट व्हायरल करत असून त्यातून अनेकदा वाद झालेले आहेत. असाच वाद सोमवारी झाला आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोशनीला तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन मारहाण केली. त्याची अद्याप पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसून उलट तिच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी रोशनी रुग्णालयात उपचार घेत असताना सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे यांनी रुग्णालयात जाऊन तिला धीर दिला. सुदैवाने तिला अंतर्गत जखमा झाल्या नसून रक्तस्त्राव ही झालेला नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र तिला ताप येत आहे.

Back to top button