

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी आज (दि.१५) माहिती दिली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. (Gulabrao Patil)
अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या नंतर राज्य मंत्रीमंडळातील सुमारे २० मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. शुक्रवारी (दि.१४) रोजी दुपारी २ वाजता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
गुलाबराव पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे जाहीर केले. यात ना. पाटील यांनी नमूद केले आहे की, मला कोणतीही तीव्र लक्षणे आढळून आलेली नसून माझी प्रकृती ही पूर्णपणे बरी आहे.
चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर मी होम क्वारंटाईन झालो असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या सर्व जणांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, त असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.