मला ‘ड्रग माफिया’ ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र; गिरीश महाजन यांचा दावा

मला ‘ड्रग माफिया’ ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र; गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर महाजन यांनी या विषयावर भाष्य केले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला 'ड्रग माफिया' म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

सीबीआय चौकशीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, रेकॉर्डिंगमुळे या षडयंत्राचा उलगडा झाला आहे. त्याची चौकशी आता 'सीबीआय'कडे देण्यात आली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही ते म्‍हणाले.

अनिल देशमुख यांच्या माध्यमातून कारस्थान

गिरीश महाजन म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना चंद्रशेखर बावनकुळे तसेच अनेक भाजप नेत्यांना षडयंत्र करून फसविण्याचा हा डाव होता. मला तर 'ड्रग माफिया' दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता.

चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईल

माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यात आला आहे. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता. याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले. यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता. मात्र, तो सर्व रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला.

हे प्रकरण चौकशीसाठी 'सीबीआय'कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, आता आमचे सरकार आले आहे, आम्ही ही सर्व चौकशी 'सीबीआय'कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news