

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह गुवाहाटीमध्ये गेल्याने ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदार शिंदे गटात गेले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत, तर एक अपक्ष आमदार हा शिवसेनेचा सहयोगी आमदार आहेत. या पाच आमदारांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. यातील दोन आमदारांमध्ये आपसात वाद असून, त्यांच्यातील हा वाद गुवाहाटीला देखील पहायला मिळाला. हा वाद इतका चिघळला की, हे दोघे आमदार हाणामारीपर्यंत पोहोचल्याची सध्या जिल्ह्यात पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल हाेत (Viral Post) आहे.
(Viral Post) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गेल्या पाच दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये जाऊन थांबले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन बंडखोर आमदार हे मंत्रिपदावरून गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये भिडल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर हे सर्व शांत झाले असले तरी भविष्यात मंत्रिपद कुणाला मिळणार यावरून वाद झाल्याचे समजते.
"मंत्रिपदावरून आसामात राडा…कोण होणार मुंबईत परतल्यावर मंत्री…. या मुद्द्यावरून जळगाव जिल्ह्यातील दोन आमदार एकमेकांशी भिडले आहेत. पार हातापाई झाली आहे, सूत्रांची माहिती." अशी एक पोस्ट सध्या जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्या पोस्टवरून जळगाव जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या दोन बंडखोर आमदारांमध्ये वाद झाला आहे, याचा उल्लेख मात्र त्या पोस्टमध्ये केलेला नाही.
जळगाव जिल्ह्यातील राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, पारोळा येथील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील, चोपडा येथील आमदार लता सोनवणे आणि मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आदींनी बंडखोरी केली आहे.
हेही वाचलंत का ?