शिंदेसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा! | पुढारी

शिंदेसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये आहेत. महाविकास अघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षपाती राजकारणाला कंटाळून शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात पेच निर्माण झाला आहे. आमदारांच्या संख्याबळा अभावी महाविकास आघाडी सरकार पडणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरुद्ध आंदोलन करत त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे. या हिंसक कृत्यामुळे बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे.

काल (दि. २५) शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्राने सुरक्षा दिल्यानंतर शिवसेना भडकली असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकावर टीका केली आहे. आता या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असे टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

Back to top button