Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्‍पर्धेत मध्‍य प्रदेशची मुंबईवर मात, प्रथमच विजेतेपदाला गवसणी | पुढारी

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्‍पर्धेत मध्‍य प्रदेशची मुंबईवर मात, प्रथमच विजेतेपदाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्‍ये प्रतिष्‍ठेची मानल्‍या जाणार्‍या रणजी ट्रॉफीवर आज मध्‍य प्रदेशच्‍या संघाने आपले नाव कोरले. अंतिम सामन्‍यात चौथ्‍या दिवशी सामन्‍यावरील पकड मजबूत करणार्‍या मध्‍य प्रदेशसमोर १०८ धावांचे लक्ष्‍य होते. त्‍यांनी ६ गडी गमावत हे लक्ष्‍य साध्‍य केले आणि रणजी ट्रॉफीवर प्रथमच आपल्‍या नावाची मोहर उमटली. ४१ वेळा ( Ranji Trophy ) रणजी ट्रॉफी जिंकणार्‍या मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Ranji Trophy : पहिल्‍या डावात मुंबईची दमदार कामगिरी

रणजी करंडक क्रिकेट स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात मुंबईने नाणेफेक जिंकल्‍यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात धमाकेदार झाली होती. सलामीवीर पृथ्‍वी शॉ आणि यशस्‍वी जायस्‍वाल यांच्‍या जोडीने नाबाद ८७ धाव केल्‍या. शॉ ४७ धावांवर बाद झाला. यानंतर मध्‍य प्रदेशच्‍या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत विकेट घेणे सुरुच ठेवले. यशस्‍वी जायस्‍वाल याने ७८ तर सरफराज खान याने १३४ धावांची खेळीच्‍या जोरावर पहिल्‍या डावात मुंबईच्‍या संघाने ३७४ धावा केल्‍या.

मध्‍य प्रदेशचे जोरदार प्रत्‍युत्तर

मध्‍य प्रदेशच्‍या पहिल्‍या डावात सलामीवीर हिंमाशू मंत्री आणि यश दुबे यांनी ४७ धावांची भागीदारी केली. हिंमाशू ३१ धावांवर बंद झाला. तर दुसर्‍या विकेटसाठी शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी २२२ धावांची भागेदारी केली. याच भागीदारीने मध्‍य प्रदेशने सामन्‍यांवर पकड निर्माण केली. शुमभ शर्माच्‍या ११६, यश दुबेच्‍या १३३ आणि रजत पाटीदारने केलेल्‍या १२२ धावांच्‍या खेळीच्‍या जोरावर मध्‍य प्रदेशने ५३६ धावांचा डोंगर रचला. आणि १६२ धावांची निर्णायक आघाडी घेतली. मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने तीन, सम्‍स मुलानी याने ५ तर मोहित अवस्‍थीने दोन बळी घेतले.

दुसर्‍या डाव्‍यात मुंबईच्‍या फलंदाजांचे खराब प्रदर्शन

दुसर्‍या डावात मुंबईचा फलंदाजांना कमाल दाखवता आली नाही. पृथ्‍वी शॉ ४४ आणि हार्दिक तमोरे २५ धावांवर बाद झाले. यानंतर अरमान जाफर ३७, सुवेद पारकर ५१, पहिल्‍या डावात ७८ धावांची खेळी करणारा यशस्‍वी एक धावांवर बाद झाला. तर पहिल्‍या डावात शतक झळकवणारा सरफराज खान ४५ धावांवर तंबूत परतला. यानंतर सम्‍स मुलाने याने १७ आणि तनुष कोत्‍यान याने ११ धावांचे योगदान दिले. दुसर्‍या डावात मुंबईतचा संघ २६९ धावात तंबूत परतला. मध्‍य प्रदेशच्‍या कुमार कार्तिकेय याने ४ तर गौरव यादव आणि पर्थ साहनी यांनी प्रत्‍येकी दोन बळी घेतले. मध्‍य प्रदेशला विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्‍य दिले. आज मध्‍य प्रदेशच्‍या संघाने ६ गडी गमावत हे लक्ष्‍य साध्‍य केले.

मध्‍य प्रदेश संघाची ऐतिहासिक कामगिरी

मध्‍य प्रदेशने प्रथमच रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. अशी कामगिरी करणारा हा २० वा संघ ठरला आहे. मागील काही वर्ष रणजी करंडक क्रिकेट स्‍पर्धेत काही नवीन संघांनी आपली कामगिरी उंचावली आहे. २०१४-१५ कर्नाटक, २०१५-१६ मुंबई, २०१६-१७ गुजरात, २०१७-१८ आणि २०१८-१९ विदर्भ, २०१९-२० सौराष्‍ट्र आणि आता २०२१-२२ वर्षात मध्‍य प्रदेशने या स्‍पर्धेत बाजी मारली आहे. २०२०-२१मध्‍ये कोरोना महामारीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्‍पर्धा रद्‍द करण्‍यात आली होती.

मध्‍य प्रदेश संघाला दोन कोटींचे बक्षीस

रणजी ट्रॉफी विजेत्‍या मध्‍य प्रदेश संघाला दोन कोटी रुपयांचे बक्षीस मध्‍य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष अभिलाष खांडेकर यांनी जाहीर केले आहे. यावेळी खांडेकर म्‍हणाले की, मध्‍य प्रदेश क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामुळे आम्‍ही आनंदीत आहोत. ही मध्‍य प्रदेश क्रिकेटसाठी अभूतपूर्व असे यश आहे. हे यश राज्‍यातील जनतेला समर्पित आहे. संघाचे प्रशिक्षक चंद्रकांप पंडित आणि सर्व संघाने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली. ‘एमपीसीए’कडून आम्‍ही त्‍यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहोत.

 

 

Back to top button