

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जात आहे. मात्र, अद्यापही राज्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
आरटीईनुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारी २०२२ पासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील ९ हजार ८६ खासगी शाळांमधील १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीमध्ये ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांच्या निवड करण्यात आली होती. लॉटरीसह प्रतिक्षा यादीतील ६९ हजार ८९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान, प्रतिक्षा यादीतील प्रवेशाची मुदत २७ मे रोजी संपल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी ३ जूनपर्यंत संधी मिळणार आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील प्रवेशाची स्थिती
शाळा : ९,०८६
उपलब्ध जागा : १,०१,९०६
लॉटरी निवड : ९०,६८५
प्रवेश निश्चित : ६९,८९०
रिक्त जागा : ३२,०१६