धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन

धुळे : अहिराणी साहित्य संमेलनात दिंडीमध्ये ठेका धरताना आ. कुणाल पाटील व नागरीक. (छाया: यशवंत हरणे)
धुळे : अहिराणी साहित्य संमेलनात दिंडीमध्ये ठेका धरताना आ. कुणाल पाटील व नागरीक. (छाया: यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे येथे खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने धुळ्यात सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा सुरू झाला असून  संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे. गांधी पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ होऊन दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. विशेषत: खानदेशी वाद्याच्या तालावर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह साहित्यिकांनी देखील फेर धरला. तर संमेलनाचे उद्घाटन खान्देशाचे दैवत आणि प्रतीक गौराई मातेच्या पूजनाने करण्यात आले. व्यासपीठावर कानबाई, गौराई , भुलाबाई यांचीही विधिवत पूजा करून मांडणी करण्यात आली होती.

माजी मंत्री रोहिदास पाटील लताताई रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील आणि संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर अहिराणी दिंडीच्या पालखीची धुरा आ. पाटील यांनी खांद्यावर घेत दिंडी मार्गस्थ झाली. दोन दिवसीय अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी,  हिरे भवन येथे संपन्न होत आहे. तर दिंडीत संपूर्ण खानदेश संस्कृतीचे सजीव देखावे सादर करण्यात आले. दिंडी गांधी पुतळा, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, जमनालाल बजाज रोड मार्गे बारा फत्तर चौकाकडून हिरे भवनात खानदेशी वाजंत्री वाजत गाजत पोहोचली.

खानदेशाचे दर्शन…
गांधी पुतळ्यापासून निघालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज,गोंधळी, व्हलर वाजा,लग्नाचे देवत,भजनी मंडळ असे खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखावे सादर करण्यात आले होते. कानबाईचे गाणे, आदिवासी नृत्य, अहिराणी गाणे यामुळे वातावरण भारावून निघाले होते.

आ.कुणाल पाटील यांनी धरला ठेका
दिंडीमध्ये खानदेशी वाजंत्री आदिवासी वाद्य तसेच वल्हर वाजंत्रीवर आमदार कुणाल पाटील यांच्यासह साहित्यिकांनी ठेका धरला. त्यामुळे आमदार कुणाल पाटील हे अहिराणीच्या या उत्सवात एकरूप झाल्याचे दिसून आले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी तसेच साहित्यिकांनीही ठेका धरल्यामुळे दिंडीमध्ये रंगत वाढली.

अहिराणी संमेलन हे साहित्याचेच नाही तर संस्कृतीचे सुद्धा आहे, कारण अहिराणी भाषा प्राचीन संस्कृती, तत्त्वज्ञान शिकवीत असते. भाषा ही जगण्याची रीत झाली पाहिजे, अहिराणी साहित्य स्वतंत्र असावे, नवीन साहित्याची निर्मिती अहिराणीमध्ये झाली पाहिजे आपण ओरिजनल आहोत, कधीही अनुवाद करू नका आपल्या संस्कृतीवर, खाद्यावर, देवावर, निसर्गावर साहित्य लिहा. जसे आपण जगत आहोत तेच साहित्यामध्ये उतरविले गेले पाहिजे. अहिराणी भाषेचा सुगंध कधीही प्रमाण भाषने समजून घेतला नाही. त्यामुळे यापुढे स्वतंत्रपणे अहिराणीमध्ये आपले स्वतःचे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. भारतात अजूनही बोली भाषेच्या नोंदी नाहीत. राजकारणामध्ये माझे आवडते नेते म्हणून दाजीसाहेब रोहिदास पाटील हे आहेत कारण त्यांनी खानदेशासाठी लढा दिलेला आहे. आज त्यांचेच वारसदार म्हणून आमदार कुणाल पाटील हे अहिराणी भाषेचा रथ समर्थपणे ओढत आहेत. – डाॅ. उत्तम कांबळे, साहित्य संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक आणि लेखक.

ज्या ज्या ठिकाणी अहिराणी आणि खानदेश आहे. त्या त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा राहील. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला अहिराणीचा वेलू गगनावर घेऊन जायचा आहे. अहिराणी जतन करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे अहिराणीच्या या उत्सवात मनापासून सहभागी होऊन सर्वांनी अहिराणी भाषेसाठी काम केले पाहिजे. – आमदार, कुणाल पाटील, धुळे ग्रामीण.

सातासमुद्रापार आहिराणीचा डंका
खानदेश आणि अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रपार गाजत असल्याचे या संमेलनाच्या वैशिष्ट्यातून दिसून आले. ईटली या देशाच्या खानदेश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान यांची उपस्थिती लाभली. त्या खानदेशातील बोली भाषा, आहिराणी, साहित्य, संस्कृतीचा त्या अभ्यास करीत आहेत. शनिवार, दि. 21 सकाळी निघालेल्या साहित्य दिंडीतही त्यांनीही खानदेशी नृत्यावर ठेका धरला. प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमुळे अहिराणी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजल्याचा अभिमान खानदेशवासियांना झाला.

घराघरात अहिराणी भाषा बोलली गेली पाहिजे तरच अहिराणी भाषेचे संवर्धन होईल. गेल्या चार अहिराणी संमेलनांना आधार देण्याचे काम दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी केले आहे, म्हणून आज अहिराणी साहित्याचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रात फडकत आहे. – सुभाष अहिरे, साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष.

इतर साहित्य संमेलनांना शासनाची आर्थिक मदत असते. परंतु अहिराणी साहित्य संमेलन हे साहित्यिकच भरवत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती अभिमानाची बाब आहे. धुळ्याची भूमी साहित्यिक, क्रांतिकारकांची, समाजसेवकांची भूमी आहे. त्यामुळे खान्देशात निर्माण होणारे साहित्य हे अभिमानास्पद आहे. अहिराणी भाषा ही आपली आई आहे, तरीही काहींना अहिराणी बोलण्याची लाज वाटते याची खंत वाटते.  मी अखेरच्या श्वासापर्यंत अहिराणीसाठी काम करणार आहे. – रमेश बोरसे, सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

संमेलनप्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, लताताई पाटील, खानदेश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, डॉक्टर सुशील महाजन, साहित्यिक कृष्णा पाटील, जगदीश देवपूरकर,नृत्य दिग्दर्शक संतोष संकद, साहित्यिक रमेश सूर्यवंशी, रत्नाताई पाटील, विश्राम बिरारी,खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, साहेबराव खैरनार, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अशोकभाऊ सुडके,डाॅ.दत्ता परदेशी, संतोष राजपूत, कृष्णा पाटील, रमेश सूर्यवंशी, डॉ.कृष्णा पोतदार, कुणाल पवार, सोमदत्त मुंजवाडकर, रमेश उची,प्रभाकर शेवाळे, डॉक्टर अविनाश जोशी, निंबाजीराव बागुल, आप्पा खताळ,वृषाली खैरनार, शरद धनगर, रमेश धनगर, प्रवीण पवार, के.बी. लोहार, मोहन कवळीदकर, जितेंद्र बहारे, सारिका रंधे, डॉक्टर शकुंतला चव्हाण, गो.पी. लांडगे,नरेंद्र खैरनार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. कवी जगदीश देवपूरकर, पुनम बेडसे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news