सासवड : शहरातील गटार सोडले उघडयावर; नगरपालिकेची ३६ कोटी ५३ लाखाची गटार योजना रखडली | पुढारी

सासवड : शहरातील गटार सोडले उघडयावर; नगरपालिकेची ३६ कोटी ५३ लाखाची गटार योजना रखडली

सासवड(ता पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : सासवड शहराची वाढीव हद्दीतील लोकसंख्येचा विचार करून राज्य शासनाने १ जानेवारी २०१९ रोजी ५८ कोटी १३ लाख रुपय खर्चाची भुयारी गटार योजना मंजूर केली, आणि त्या कामासाठी पहिला टप्पा ३६ कोटी ५३ लाखाचा आहे, परंतु सासवड नगरपालिकेची भुयारी गटार योजनेची मुदत संपलेली असून उघड्यावर सांडपाणी व मैलापाणी सोडून प्रदूषण सुरू ठेवल्याबद्दल तक्रार व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी डॉ. उदयकुमार जगताप यांनी केली आहे. एकमेव वृत्तपत्र दैनिक पुढारीने सामाजिक विषयात प्राधान्याने प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार. सासवड नगरपालिकेला भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ऑगस्ट २०२० पर्यंतची मुदत दिलेली होती, ती मुदत संपून आता भरपूर कालावधी उलटून गेला आहे.

फुटलेले चेंबर व अपूर्ण राहिलेली योजना याने संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेला अनेकवेळा प्रदूषण मंडळाने दंडात्मक कारवाई केलेली आहे. तरीही नगरपालिकेने योजना मुदतीत पूर्ण केलेली नाही. नगरपालिकेने सुरू ठेवलेल्या प्रदूषणाबाबत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर, ठेकेदारावर कारवाई करून योजना पूर्ण करावी. प्रदूषण ताबडतोब थांबवण्यात यावे व लवकरात लवकर सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करावे. सासवड मधील सर्व्हे क्रमांक ११ व सर्व्हे क्रमांक ६४ मध्ये नगरपालिकेने उघड्यावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडले असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

दरम्यान १ जानेवारी २०१९ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली दोन टप्प्यात आणि २ वर्षाच्या आत सासवड नगरपरिषदेला ही योजना पूर्ण करायची होती, परंतु नगरपरिषदेला ती पूर्ण करता आली नाही. तसेच १९६९ मध्ये चौखंडी भागात जलनिस्सारण केंद्र व शहरातील भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यात आली. ती योजना शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कालबाह्य ठरल्याने २०१८ मध्ये पुढील ५० वर्षाचा विचार करून नव्या महत्वकांशी योजनेस मंजुरी देण्यात आली.

२०२० मध्ये हे काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र २०१९ आणि २०२० मध्ये क-हा नदीस पूर आल्याने काम बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान पहिल्या टप्प्यातील वाढीव हद्दीतील होती, मात्र मुख्य गावठाण असलेल्या भागात ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आणि नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आजही येथील काम ठप्प आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनी व नगरपरिषदे विरोधात डॉ उदयकुमार जगताप यांनी नागरीकांसाठी आवाज उठवला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सासवड शहरातील भुयारी गटार व मलनिस्सारण केंद्र या योजनेचे दिलेल्या वेळेत काम पूर्ण झाले नाही. हे खरे असले तरी चौखंडी मधील मलनिस्सारण केंद्राचे काम सुरू आहे. नवीन पाईपलाईनच्या कामास मंजुरी आल्याशिवाय गावठाणात हद्दीतील कामे करणे शक्य होणार नाही. दिरंगाई बाबत ठेकेदार कंपनीवर ऑगस्ट पासून दंडात्मक कारवाई सुरू आहे.

                                                                              निखिल मोरे
मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

Back to top button