नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या सहा मे रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आजी-माजी व नवीन उमेदवार इच्छुक असून, शनिवारी (दि. 16) 60 इच्छुकांनी फॉर्म नेले असून, त्यापैकी सुमारे 24 जणांनी फॉर्म भरून दिले आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह एकूण 11 पदांसाठी यंदा सातव्यांदा निवडणूक होत आहे. त्यात सलग दोनदा अध्यक्षपद भूषविलेले ड. नितीन ठाकरे हे तिसर्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. मागील पदाधिकार्यांचा कार्यकाळ 2021 मध्ये संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका झाल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने काही दिवसांपूर्वी निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात सोमवार (दि. 18) पर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर दोन दिवस अर्जांची छाननी होऊन अंतिम उमेदवारांची यादी तयार केली जाईल, तर सहा मे रोजी मतदान होणार असून, सात मे रोजी मतमोजणी होणार आहे. सातव्या निवडणुकीत जिल्हाभरातील तीन हजार 465 वकील मतदार असून, ते नवीन पदाधिकारी निवडणार आहेत. दरम्यान, शनिवारी (दि. 16) अध्यक्षपदासाठी ड. ठाकरे, ड. महेश आहेर, उपाध्यक्षपदासाठी ड. प्रकाश आहुजा, वैभव शेटे, सचिवपदासाठी ड. महेश गायकवाड, सहसचिव पदासाठी ड. प्रवीण साळवे, ड. राहुल जगताप, ड. संजय गिते, महिला सहसचिव पदासाठी ड. श्यामला दीक्षित, ड. सोनल कदम व ड. स्वप्ना राऊत, खजिनदार पदासाठी ड. राहुल जगताप, सदस्य पदासाठी ड. संतोष जथे, ड. अनिल गायकवाड, ड. महेश यादव, ड. किरण बोंबले, ड. अनिल शर्मा, ड. प्रतीक शिंदे, ड. किशोर सांगळे, ड. शिवाजी शेळके, तर महिला सदस्यपदासाठी ड. कोमल गुप्ता सात वर्षांआतील सदस्यपदासाठी ड. अविनाश गांगुर्डे, मोहन पिंगळे, विशाल मटाले यांनी अर्ज भरून जमा केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ड. बिपीन शिंगाडा हे अध्यक्षपदी असून सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ड. संदीप डोंगरे, सदस्य म्हणून भगवंतराव पाटोळे व ड. अतुल गर्गे हे काम पाहात आहेत.