

धुळे : यशवंत हरणे
आपल्या हातातील जादूने अनेक समाज सुधारकांचे हुबेहूब पुतळे तयार करणारे पद्मभूषण राम सुतार यांचा धुळ्यातून सुरू झालेला प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. धुळे तालुक्यातील गोंदूर गावात वडिलांच्या माध्यमातून लाकडी खांबांवर नक्षी करण्याची अवगत केलेल्या कलेला त्यांनी मूर्ती कलेच्या माध्यमातून जगभरात नेले. यातून भारत आणि धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पलीकडे गेले. वयाच्या शंभरीनंतर पद्मभूषण राम सुतार यांचे निधन झाले आहे आज धुळे जिल्ह्यात त्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेले सवंगडी नसले तरीही त्यांच्या पुतणे रवी सुतार( देवरे) यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी मात्र ताज्या आहेत.
धुळे शहरालगत असणाऱ्या गोंदूर गावात 19 फेब्रुवारी 1925 रोजी राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा सुतार काम करण्याचा व्यवसाय होता. त्यावेळी धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये लाकडी खांब घरासाठी वापरले जात होते .या खांबांवर वेगवेगळे नक्षीकाम कोरीव काम करून सुतार परिवार आपला उदरनिर्वाह करीत होता. तर गोंदूर जवळील तलावातील मातीच्या माध्यमातून वस्तू तयार करण्याचे काम देखील या परिवाराने केले .राम सुतार यांना पाच भावंडे होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण निमडाळे येथील शाळेत झाले.
त्यांचे वडील घरकामानिमित्त धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यांवर संपर्क ठेवून असत. या संपर्कामुळेच धुळे तालुक्यातील नेर येथे राहणाऱ्या जोशी परिवाराबरोबर सुतार यांचा संपर्क आला. याच जोशी गुरुजींच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळी सातवी फायनल पर्यंतचे शिक्षण घेतले. तर पुढे जे जे आर्ट ऑफ स्कूल मध्ये देखील जोशी परिवाराच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा मार्ग गवसला .जे जे आर्ट ऑफ स्कूल मध्ये त्यांनी कलेची चुणूक दाखवली. यावेळी त्यांना गोल्ड मेडल देखील मिळाले. शासनाच्या माध्यमातून त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ आणि अजिंठा या लेणीच्या देखरेखी साठी नियुक्ती झाली.
पद्मभूषण राम सुतार यांचे वडील बंधू भटू वणजी देवरे (सुतार ) यांचा मुलगा रवी सुतार आणि भाऊ वाल्मीक सुतार यांना दरम्यानच्या काळात दस्तूर खुद्द राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखालीच मूर्ती तयार करण्याची कला अवगत करण्याची संधी मिळाली. या संधीचे या दोघ भावंडांनी देखील सोने केले. त्याविषयीची आठवण सांगताना रवी सुतार म्हणतात की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मूर्ती कलेच्या माध्यमातून पद्मभूषण राम सुतार यांचे नाव पोहोचले असले तरी महाराष्ट्राबद्दल त्यांचे प्रेम हे फार मोठे होतेः आम्हाला शिक्षण देत असतानाच मूर्तिकला शिकवत असतानाच त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये आपली कला पोहोचवण्यासाठीच्या आग्रह धरला.
त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रामध्ये मूर्ती घडवण्याचेच काम करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. आज राम सुतार यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या जोशी परिवाराचा धुळे जिल्ह्यात कोणतीही कोणताही संपर्क नाही. तसेच राम सुतार यांच्या वयाचे देखील सवंगडी हयात नाहीत. मात्र त्यांच्या आठवणी त्यांचे वडील बंधूंच्या माध्यमातून रवी सुतार हे सांगतात कलेचा हा वारसा या बंधूंनी देखील पुढे सुरू ठेवला आहे.