

Dhule murder case
धुळे : भिक्षेकरी वृध्देचा खून करणाऱ्या गुन्हेगाराला अवघ्या 24 तासात गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आले आहे. चोरी करताना पकडला जाऊन वृध्द महिलेने प्रतिकार केला. म्हणून धारदार खुरपीने मृत महिलेच्या गुप्तांगात वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मनगटी घडयाळावरुन खुनाचा गुन्हा उघड केला आहे.
मोहाडी उपनगरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीमध्ये राहणाऱ्या 75 वर्षे वयाच्या भिक्षेकरी लीलाबाई हिरामण सुर्यवंशी यांचा मृतदेह घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. तसेच ठसे तज्ञ आणि श्वानपथकाच्या माध्यमातून गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला गेला.
या प्रकरणात संतप्त भावना व्यक्त झाल्यामुळे पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने गुन्हेगाराला अटक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी तातडीने हालचाली केल्या. यासाठी विशेष पथकाचे गठन करण्यात आले.
घटनास्थळी गुन्हेगाराने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र घरात एक मनगटी घड्याळ आढळून आले. याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी एक मनगटी घड्याळ मिळून आले. घडयाळाचा धागा पकडून घडयाळाचा फोटो मोहाडी परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. एका गोपनीय बातमीदाराने घडयाळ ओळखून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयिताबाबत माहिती दिली.
संशयित आरोपीच्या घरी व त्याचे थांबण्याच्या ठिकाणी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर संशयित आरोपी सागर राजु कोळी (वय 25) हा महेबुब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यास सदर ठिकाणाहून चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला अनेक प्रश्न विचारुन देखील तो काहीएक सांगत नव्हता. त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
घटनेच्या रात्री त्याचे घराजवळच राहत असलेल्या लिलाबाई हिरामण सुर्यवंशी यांचे घरात चोरी करण्याचे उद्देशाने प्रवेश करुन घरातील डबे, घरगुती गॅस सिलेंडर चोरी केली. सिलेंडरचे रेग्युलेटर काढत असताना मृत लिलाबाई सुर्यवंशी यांना जाग आल्याने त्यांनी प्रतिकार केला. म्हणुन आरोपीने त्यांना मारहाण करुन ढकलले. व त्यांचे गुप्तांगात स्टिलची खुरपीने वार करून खून केला, अशी कबुली दिली. त्याआधारे गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार करीत आहेत.