

धुळे : महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच भारतीय जनता पार्टी धुळ्यात पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात हिंदू बहुल १५ प्रभागांतून ‘५५ प्लस’ जागा जिंकण्याचा स्पष्ट नारा देण्यात आला. यावेळी काही प्रभागांत राजकीय समीकरणे बदलली जातील, असे संकेत स्वतः आमदार अग्रवाल यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे काही दिग्गज व वारंवार नगरसेवक राहिलेल्या इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार अग्रवाल म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत भाजपने केंद्र, राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. या विकासकामांचा वारसा जनतेपुढे प्रभावीपणे मांडावा. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात निवडणूक ही व्यक्तीची नव्हे, तर पक्षाच्या चिन्हाची असेल. ‘कमळ’ हेच आपले उमेदवार आहे. ‘५५ प्लस’ हा एकमेव ध्येय ठेवून कमळ विजय यात्रेच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करा. ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्याच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून केवळ पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी काम केल्यास महापालिकेत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
या बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, महानगर जिल्हा उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, मंडळाध्यक्ष अमोल मासुळे, रवींद्र निकम, ज्ञानेश्वर पाटील, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, महादेव परदेशी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, अल्पा अग्रवाल, कल्याणी अंपळकर तसेच कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय समीकरण बदलाचे संकेत
आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी आता अवघा एक महिना शिल्लक आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असून सर्वजण तोलामोलाचे आहेत. १७ प्रभागांत प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांत प्रत्येकी तीन उमेदवार असतील. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने कुणीही नाराज होऊ नये. काही ठिकाणी परिस्थितीनुसार राजकीय समीकरणे बदलावी लागतील. प्रत्येक वेळी ठराविक व्यक्तीलाच उमेदवारी मिळेल, असे नाही. पक्षाचे सर्व्हे सुरू असून वरिष्ठ नेते प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम मानून सर्वांनी एकदिलाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.