Dhule News : जिल्ह्यात 573 सिकलसेल रुग्ण, 4,374 वाहक आढळले

जिल्ह्यात 5 लाख 62 हजार सोल्यूबिलिटी चाचण्या
Sickle cell
Dhule News : जिल्ह्यात 573 सिकलसेल रुग्ण, 4,374 वाहक आढळलेPudhari News Network
Published on
Updated on

धुळे : धुळे जिल्ह्यात २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण ५ लाख ६२ हजार २६५ सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्यांत ५७३ सिकलसेल रुग्ण आणि ४ हजार ३७४ सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. सिकलसेल आजाराचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

याच कालावधीत राज्यभरात १ कोटी ५ लाख ८६ हजार ७३३ सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून १२ हजार ४२० सिकलसेल रुग्ण आणि १ लाख २४ हजार २७५ सिकलसेल वाहक आढळले आहेत.

राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागांत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशीम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि हिंगोली अशा २१ जिल्ह्यांचा समावेश आहे.

Sickle cell
Dhule Municipal Corporation : मनपा निवडणुकीसाठी ‘55 प्लस’चा नारा

कार्यक्रमांतर्गत जनजागृती, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एचपीएलसी तपासणी, रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण तसेच टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला या सुविधा दिल्या जात आहेत.

गर्भजल तपासणी करण्याचे आवाहन

सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये येतो. त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे आवश्यक आहे. वाहक-वाहक किंवा वाहक व रुग्ण यांच्यातील विवाह टाळल्यास आजाराचा प्रसार रोखता येऊ शकतो. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा २ हजार ५०० रुपये आर्थिक सहाय्य, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अतिरिक्त वेळ, तसेच उपचारासाठी बस प्रवासात सवलत दिली जाते. सिकलसेल आजारावर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, समतोल आहार आणि काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो. जिल्ह्यातील नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news