Maratha Survey : साक्री तालुक्यातील 50 हजार कुटुंबांचे करणार सर्वेक्षण

file photo
file photo

पिंपळनेर:(जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा- राज्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ होत आहे. आठ दिवस चालणाऱ्या मोहिमेत साक्री तालुक्यातील सुमारे पन्नास हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्यात सर्वेक्षण करण्यासाठी 706 प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात महिन्यांपासून आंदोलन छेडले आहे. आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असताना मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबिण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संपूर्ण राज्यभर सर्वेक्षण होणार आहे. नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक गावनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.

सर्वेक्षणासाठी अॅप

सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अॅप विकसित करण्यात आले आहे. त्यात नाव, गाव, तुम्ही मराठा आहात का, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा किंवा कुणबी आहात का, मराठा नसल्यास कोणत्या जाती- धर्माचे आहात, गावाला जोडणारा रस्ता आहे का, कुटुंबाचा व्यवसाय, सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व, कुटुंबात कोणी लोकप्रतिनिधी आहे का, कुटुंबाची आर्थिक स्थिती, घराचे क्षेत्रफळ, घरातील पेयजल स्रोत, शेतजमीन मालकीची आहे का, गेल्या 15 वर्षांत कर्ज घेतले का, तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशनकार्ड आहे, कुटुंबाची सामाजिक माहिती असे विविध 183 प्रश्न सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात येणार आहेत. ही सर्व माहिती मोबाईल ॲपद्वारा संकलित केली जाणार आहे.

समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येत असून, यात साक्री तालुक्यातील सुमारे पन्नास हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी 706 प्रगणक, पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना गेल्या दोन दिवसांत प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करावे.- साहेबराव सोनवणे, तहसीलदार, साक्री

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news