

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या सक्रीय सदस्यास नाशिकमधील आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. पथकाच्या तपासात संशयिताने दुबईतून हवालामार्फत पैसे पाठवल्याचे समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी न्यायालयाने संशयिताच्या कोठडीत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
शहरातील तिकडे कॉलनी परिसरातून २२ जानेवारी रोजी संशयित हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) यास नाशिक दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. त्याला मंगळवारी (दि.२३) जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आठ दिवसांचा तपास पूर्ण केल्यावर एटीएसने बुधवारी (दि. ३१) संशयित हुजेफ यास न्यायालयात हजर केले. त्यावेळी संशयिताची सीरियातील महिला राबीया हिच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली चॅटिंग, आर्थिक व्यवहार यासंदर्भातील पुरावे सादर करण्यात आले. दुबईतून हवालामार्फतही काही रक्कम 'इसिस'च्या सदस्यास दिल्याचा दावा एटीएसने केला. त्यानुसार न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी संशयित हुजेफ यास पाच फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि विरोधी पक्षाकडून ए. आय. देशमुख यांनी युक्तिवाद केला.
धर्मयुद्धातील मृतांच्या नातलगांना मदत
संशयित हुजेफ शेख हा इंजिनीअर असून त्याचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. नाशिकसह इतरत्र त्याच्या कंपन्या असून इतर कंपन्यांमध्ये तो भागिदार आहे. त्याने सीरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठविल्याचे उघड झाले आहे. नाशिकसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि बिहार राज्यातूनही त्या महिलेला फंडिंग झाले. इसिसने २०१९ मध्ये पुकारलेल्या धर्मयुद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या नातलगांसाठी हे पैसे पाठवल्याचा दावा करण्यात आला.
बारा मुद्द्यांवर युक्तीवाद
एटीएसने आज न्यायालयात बारा मुद्द्यांवर युक्तीवाद करीत कोठडीची मागणी केली. त्यात हुजेफशी संबंधित २६ बँक खाती समोर आली असून त्यातील १३ खात्यांचा व्यवहार तपासला असून इतर बँक खात्यांचा तपास प्रलंबित असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल, फेसबुक, इनस्टाग्राम या माध्यमातील ९ खात्यांवरून संशयिताने राबियासोबत संपर्क साधला. यात ८ हजार ५७० संशयास्पद चॅट्स आढळून आले असून त्याचा ४०० एमबी डाटा एटीएसने न्यायालयात सादर केला. १५ हजार पानांचा पंचनामा न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच संशयिताने ६४ हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात टाकले आहे. यूके, दुबई, मलेशिया, कतारमध्ये संशयिताने सातत्याने फोन केल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे दुबईच्या हवालासंदर्भात केंद्रीय यंत्रणांकडे चौकशी सुरु आहे. संशयिताने भारतीय चलनाचे दिरहम मध्ये रुपांतरीत करून हवालामार्फत पैसे पाठवल्याचा दावा तपासी पथकाने केला. त्यामुळे संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.
न्यायालयात पुरावे सादर
एटीएसने संशयिताचे महत्वाचे ध्वनी व चित्रफीतीचे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यात संशयित व त्याच्या सहा वर्षाच्या मुलीमध्ये झालेल्या संवादाचे 'व्हाइस रेकॉर्डिंग', यासह सीरियातील महिला व संशयितामध्ये पडघामध्ये झालेल्या 'एनआयए'च्या कारवाईवरून दोघांमधील आक्षेपार्ह चॅटिंगही सादर केले. तसेच सिरीयातील महिला इसिसची सक्रीय समर्थक असल्याच्या चित्रफीत सादर केल्या.
इतरांनाही प्रवृत्त केले
एटीएस तपासात संशयित हुजेफ व राबियाने हैद्राबाद येथील अब्दुल रौफ यालाही आर्थिक मदत करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले. अब्दुलने ५० हजार रुपयांची मदत केल्याचे पुरावे असल्याचे समजते. त्यादृष्टीनेही एटीएस तपास करीत आहे. त्यामुळे टेरर फंडींग प्रकरणात इतर संशयितांचाही समावेश समोर येत आहे.
हेही वाचा