

मुंबईः आज झालेल्या महापालिका निवडूकांमध्ये सरासरी 50 टक्केपर्यंत मतदान झाले आहे. अनेक मतदार केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. काही ठिकाणी केंद्रावर गोंधळ दिसून आला. तर काही ठिकाणी मतदारयांद्यामध्ये घोळ दिसून आला. शुक्रवारी लगेच मतमोजणी असल्यामुळे यंत्रणा कार्यरत झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेसाठी मतदान सुरु असताना नेरूळ,शिरवणे गावातील प्राथमिक आरोग्य मतदान केंद्रावर अचानक एक साप आला. त्यामुळे मतदान केंद्रावर काहीकाळ खळबळ उडाली. दरम्यान प्रसंगावधान राखत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने सापाला पकडले व लांब सोडून दिलेा मात्र अचानक साप आल्याने काही काळ मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते हा नाग असल्याची माहीती मिळत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मतदानासाठी सात वाजले तरी अद्याप मतदान प्रक्रिया सुरूच असल्याचे दिसून येते. मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 तीन मध्ये मतदान सुरूच आहे. सायंकाळी 5.30 वाजता प्रभाग क्रमांक तीन मधील केंद्र क्रमांक 26 मध्ये मतदानासाठी मतदाराने रांगा लावल्या. 70 जणांनी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्राच्या गेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र पोलीस आणि केंद्रप्रमुखांनी मतदान केंद्राचे मुख्य गेट बंद केले. गेटमधून आत आलेल्या 70 जणांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. व तब्बल दीड तास लोटला तरी अद्याप मतदान प्रक्रिया सुरूच असल्याचे दिसून येते. सात वाजून गेले तरी अद्याप 15 ते 20 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत थांबले होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूकीत एका मतदाराच्या नावावर बोगस मतदान झाल्याने उघड झाल्याने एका मतदाराला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी देण्यात आली. हा संबधित मतदार मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच मतदाराच्या नावाने बोगस मतदान झाले होते. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी (दि. 15) मतदान झाले असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 2 हजार 869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. तब्बल 9 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना अशा 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले.
निवडणुकीसाठी 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत, मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तेथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या निकाल जाहीर होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची अधिकृत वेळ सायंकाळी ५.३० वाजता संपली आहे. मात्र मतदान केंद्रांवर आधीपासून रांगेत उभे असलेले मतदार अजूनही मतदान करत असल्याचे चित्र राज्यातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. नियमानुसार वेळेआधी रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाची संधी देण्यात येत असून, State Election Commission, Maharashtra यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
अकोला महापालिकेच्या मतदानादरम्यान भांडपुरा येथील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
''बोटावरची शाई पुसली जाणं, व्हीव्हीपॅट नसणं, ऐनवेळी पाडूचा वापर, दुबार मतदार,एकाचं उमेदवारांने दोन ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवणं, मतदारांना केंद्र न सापडणं, ईव्हीएम बंद पडणं,त्यात बिघाड होणं,पैशांच्या वाटपाला खुली मुभा या आणि अशा अनेक गोष्टी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयोगाने “आधीपासूनच ते तसंच सुरू आहे” या शब्दांत नागरिकांची बोळवण करणं योग्य नाही. निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे की नाही?आयोगाने निवडणूक विश्वासार्ह, सुरक्षित आणि निर्दोष कशी पार पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. थातुरमातूर कारणांच्या मागे लपणं योग्य नाही.''- अशी पोस्ट विजय कुंभार यांनी केली आहे, (उपाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र)
पुरुष 77695
स्त्री 71133
इतर 30
एकूण 148858
टक्केवारी 48.49
मार्कर पेन शाईच्या गोंधळानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढच्या निवडणुकीत मार्कर पेन ऐवजी पारंपरिक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई - २९.९६%
इचलकरंजी - ३१.२९%
पनवेल- ३२%
जालना- ३२.७२%
परभणी - ३५.२३%
नाशिक - २३.३७%
सांगली - २९.२३%
अहिल्यानगर - ३३.९१%
ठाणे - ३०.३५%
अकोला - ३०.४५%
भिवंडी निजामपूर - २६.१८ %
नागपूर - २६.५० %
उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ऑनलाईन मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावर लावण्यात आलेली छापील यादी यामध्ये तफावत असल्यामुळे स्वप्निल नारखेडे यांना मतदान करता आले नाही.
मतदान दि. 15 जानेवारी 2026
सकाळी 7.30 ते 1.30
मतदान टक्केवारी- 30.75%
निवडणूक आयोग एखाद्या शाळेच्या वर्गातील मॉनिटरची निवडणूक असते त्या प्रकारे निवडणूक घेत आहे.
दुपारी १.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी २७.८९ टक्के इतकी आहे.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 21 मधील भाजप उमेदवार नितीन खोले हे पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरुन शिवसेना आणि भाजप पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले. तर सावतानगर येथे पैसे वाटत असल्याच्या अफवेने गर्दी झाल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे हे भाजपच्या सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. शहाणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या गाडीत पैसे सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गाडीसह दोन लाखांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या मुद्द्याने कामोठे परिसरात चर्चा निर्माण झाली आहे. कामोठे येथील बूथ क्रमांक १३ आणि केंद्र क्रमांक ३ मधील इंडो-स्कॉट शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेल्या सुनील शिरीषकर यांनी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई साध्या पाण्याने व टिशू पेपरने पुसली जात असल्याचा दावा केला असून, यासंदर्भात व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केला आहे.
चिंचवड गावातील उर्दू शाळा समोर वाद चिघळला. सगळ्या मशीनवर कमळ लाईट लागत असल्याची तक्रार. तर प्रभाग क्रमांक 17 येथे भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. वादाचे कारण अस्पष्ट.
मुंबई : 17.73%
नवी मुंबई : 19.68%
ठाणे : 19%
कल्याण – डोंबिवली : 17.53%
मिरा भाईंदर : 16.69%
भिवंडी : 15.37%
उल्हासनगर : 9.92%
वसई – विरार : 19.34%
पनवेल : 18%
नाशिक : 16.07%
धुळे : 14%
जळगाव : 13.40%
मालेगाव : 20.92%
नागपूर : 12%
अमरावती : 17.01%
कोल्हापूर : 22.45%
अहिल्यानगर : 20.16%
मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली. वागळे इस्टेट येथील निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्याविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली असून शिंदें गटाचे चिन्ह स्पष्ट दिसणारे बॅनर झळकत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
कोल्हापूरमधील प्रभाग क्रमांक दहा उमेदवारांच्या बूथ वर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना वडा वाटप, विरोधी उमेदवारांच्या समर्थकांनी घेतला आक्षेप. तर न्यू पॅलेस येथील मराठी शाळेच्या केंद्रावर काँग्रेस उमेदवार सरोज सरनाईक आणि भाजपच्या उमेदवार पल्लवी देसाई यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ऑब्जेक्शन घेण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे वृत्त आहे. जरगनगर मतदान केंद्रावर मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. मतदानाला आलेल्या मतदारांचे मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना तासभर ताटकळत बसण्याची वेळ आली.
मुंबई : 6.98 %
नवी मुंबई : 8.18%
ठाणे : 8%
कल्याण - डोंबिवली : 7.21%
नाशिक : 6.51%
छत्रपती संभाजीनगर : 7.07%
अहिल्यानगर : 7.83%
पनवेल : 7.61%
नागपूर : 7%
जळगाव : 5.5%
अमरावती : 7%
उल्हासनगर : 1.98%
मुंबई, पनवेल, पुण्यात मतदाराच्या बोटावर शाई वापरण्याऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप. बोटावर मार्कर वापरताना नखावरील शाई पुसली जात असल्याचे मुंबई महापालिका आयुक्तांकडून मान्य. शाईऐवजी मार्करचे किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करुन दिले गेले असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शाईचा हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. पुण्यात धायरी येथील प्रभाग 34 येथील शाळा नारायणराव सणस विद्यालय येथे मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिला. बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी मतदान केंद्रावर काहींनी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा केला जातोय.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासांत सुमारे 8 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. कोथरूड येथील एकलव्य कॉलेजमधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी मतदानासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधत, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील मशीनमध्ये बिघाड
- भाजपचे पुरस्कृत उमेदवार यांच्या नावा समोरील बटन दाबलं जात नसल्याची तक्रार
- तक्रारी तथ्य आढळल्यानंतर लावण्यात आलं दुसर मशीन
- मात्र दुसरे मशीनही नादुरुस्त असल्याने मतदारांचा खोळंबा
- प्रभाग क्रमांक 26 मधील बूथ क्रमांक 16 दक्षिण मुखी हनुमान मंदिर या मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड
- भाजपाचे पुरस्कृत उमेदवार मोहिनी अशोक पवार यांच्या नावासमोरील बटन दाबल जात नसल्याची तक्रार
नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यालय जाळल्याची गंभीर घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील काँग्रेसच्या उमेदवार शिवानी चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमागे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवार पेठ प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणीही दोन ठिकाणी मशीन बंद. मतदारांचे सिक्वेन्स ही चुकलेले. अ ब क ड नुसार सिक्वेन्स नाही. उमेदवारांनी घेतला आक्षेप
कोल्हापुरातील जरगनगर येथील मतदान केंद्रावर मतदार यादीतील घोळ अद्याप सुटलेला नाही. मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला आहे.
या गोंधळामुळे सुमारे तासभर मतदान प्रक्रिया ठप्प झाली असून मतदारांना केंद्राबाहेर ताटकळत थांबावे लागले. घटनेची माहिती मिळताच निवडणूक कर्मचारी व प्रशासनाकडून यादी तपासणीचे काम सुरू असून, मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मतदार यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दुबार मतदारांची नावे टाकण्यात आली, तर काही ठिकाणी जिवंत नसलेल्या व्यक्तींची नावे यादीत ठेवली गेली आणि जिवंत मतदारांची नावे वगळली गेली, असे त्यांनी सांगितले.
“मतदारांकडे क्रमांक असूनही मला मतदानासाठी दीड मिनिट लागला. आता रांगा वाढल्या तर किती वेळ लागेल, याचा विचार करा,” असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 355 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. आज 2 लाख 99 हजार 994 मतदार आपला हक्क बजावणार असून 66 नगरसेवक पदांसाठी 451 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर वादावादीचा प्रकार समोर आला. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. 'दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका' असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले. प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळा मधील मतदान केंद्रावर तणाव. पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न.
राज्याचे मंत्री आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा सांभाळणारे गणेश नाईक आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सेंट मेरी सीबीएसई शाळेत मतदानासाठी पोहचले. दर पंचवार्षिक निवडणुकीत गणेश नाईक आणि कुटुंब सर्वाधिक आधी म्हणजे पहिले मतदान करायचे यावेळी पहिले मत टाकण्याची संधी नाईक कुटुंबाची हुकली. 'विरोधकांना रात्री झोप लागली नाही. त्यांची झोप उडली आहे. मी रात्री दहा वाजता झोपलो आणि मतदानासाठी आलो', नाईकांची विरोधकांना उद्देशून खोचक प्रतिक्रिया.
ठाण्यातील नौपाडा प्रभागातील सुरभी सोसायटी येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये मशीन बंद पडल्याने मतदान केंद्रावर मतदार रांगेत ताटकळत उभे.
सेंट हिल्डज स्कूल गुरुवार पेठ अजून मतदान सुरू नाही. यंत्रे खराब बदलून देण्याची प्रक्रिया सुरू मतदानाचा पहिला तास वाया
तीन मतदान केल्यानंतर चौथं मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही ईव्हीएम मशीन मध्ये सात वाजून 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट जास्त दाखवत असल्याचा अंकुश काकडे यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक - 3 बेगमपुरामधील ज्ञानेश्वर विद्यालय येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड. तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये मतदानाला सकाळी आठपर्यंत मतदानाला सुरूवात झाली नव्हती. EVM मध्ये बिघाड झाल्यानं मतदानाला विलंब. नाशिकमधीलच नवीन नाशिक येथे प्रभाग 29 च्या खोली क्रमांक 2 मतदान केंद्र 18 मध्ये ईव्हीम बंद. तर नागपूरमधील प्रभाग २३ मध्ये EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
महापालिका निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता राज्यभरात मतदानाला सुरूवात.
मुंबई : सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) मतदान होणार असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 2 हजार 869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. तब्बल ९ वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे.
महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे? List of 29 Municipal Corporations Going to Polls
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना अशा 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे.
निवडणुकीत एकूण किती उमेदवार रिंगणात? Maharashtra Municipal Corporation Elections 2026 Key Details
निवडणुकीसाठी 15 हजार 908 उमेदवार रिंगणात असून, मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तेथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे.
किती महापालिकांमध्ये महायुती आहे?
राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे; तर शिवसेना-भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे. उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
महापालिकेच्या निमित्ताने ठाकरे- पवार कुटुंब एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये एकत्र आले आहेत; तर पंचवीस वर्षांपूर्वी वेगळे झालेले उद्धव आणि राज ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही मुंबईत पहिल्यांदाच आघाडी झाली आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत एकूण किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार?
निवडणूक आयोगाने एकूण 3 कोटी 48 लाख 39 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. तसेच, पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील.
काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: 4 मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.
मतदानासाठी आज सुट्टी
महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे व नागरिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी मतदान होणार्या महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व खासगी आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पुरावे ग्राह्य धरले जातील?
भारताचा पासपोर्ट
आधार ओळखपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र
राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड
निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी
लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधान परिषद/ सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्या मतदान यंत्राची मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे एक सदस्यीय पद्धत असलेल्या मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरलेली भारत निवडणूक आयोगाची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. तर इतर २८ महापालिकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या यंत्रांचा वापर केला जाणार आहे.