

पुणे: पिंपळे निलख येथील भाउसाहेब साठे प्राथमिक शाळा, प्रभाग क्रमांक २६ परिसरात गावकरींनी लावलेल्या “राम कृष्ण हरी” या मजकुराच्या फ्लेक्सवरून आज (दि.१५ जानेवारी) सकाळी मोठा गोंधळ उडाला. सदर फ्लेक्स हटविण्याच्या कारवाईदरम्यान महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ व उमेदवार यांच्यात तीव्र वादावादी झाली.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, हा फ्लेक्स गेल्या पंधरा दिवसांपासून लावलेला असताना प्रशासनाने आजच अचानक कारवाई का केली? तसेच शाळेच्या गेटवरच उमेदवाराचे फोटोचे स्टिकर्स आहेत ते काढले नाही ते प्रशासनाला दिसत नाही का ? “आजच वातावरण निर्मितीसाठी मुद्दाम मुहूर्त काढला का? आमच्या धार्मिक भावनांशी खेळ केला जात आहे का?” असे थेट सवाल शिरीष साठे व संबंधित उमेदवारांनी उपस्थित केले.
ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी व शिरिष साठे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “राम कृष्ण हरी” हा फ्लेक्स कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. हा केवळ गावकऱ्यांनी श्रद्धेने लावलेला धार्मिक फलक आहे. तो हटवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम प्रशासन करत आहे. याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही.”
दरम्यान, कारवाईदरम्यान सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी सांगितले की, विनापरवाना फ्लेक्स असल्याने आणि कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यामुळे हा फ्लेक्स काढण्यात येत आहे. या कारवाईवेळी पिंपरी-चिंचवडचे सहा. पोलीस निरीक्षक मनोहर कडू सोनवणे, सुरक्षाबल गटाचे दोन कर्मचारी, तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कार्यवाही पथकाकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रतिक कांबळे (लिपिक) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रतिक कांबळे यांनी स्पष्ट केले की, या फ्लेक्ससाठी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. फ्लेक्स पंधरा दिवसांपासून लावलेला असला तरी आज तक्रार प्राप्त झाल्याने आजच कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाईदरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत निषेध नोंदवला आहे. पुढील काळात याचे राजकीय व सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.