Dhule Police Attack | धुळ्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला! पोलीस निरीक्षकासह सहा कर्मचारी जखमी; आरोपीला पळवून नेले

आझादनगर परिसरात पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण; छातीत दुखत असल्याचा बहाणा करून आरोपीने साधली संधी; ११ जणांसह जमावाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
Police Assault
Police AssaultPudhari
Published on: 
Updated on: 

Police Assault Dhule

धुळे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील आझादनगर परिसरात घडली. आरोपीला ताब्यात घेत असतानाच त्याचे नातेवाईक आणि समर्थकांनी एकत्र येत पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली. या झटापटीत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. विशेष म्हणजे, आरोपीने छातीत दुखत असल्याचा बहाणा केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात ११ जणांसह जमावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौलवीगंजपासून सुरू झाला पाठलाग

धुळे शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात जब्बार शहा गुलाब शहा फकीर याचा सहभाग असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोपी मौलवीगंज परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे आणि योगेश शिंदे तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच जब्बार याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला.

Police Assault
Dhule Crime | गुंडाने छतावर चढून तलवार फिरवली; स्वतःवरही केले वार, जखमी अवस्थेत पोलिसांनी घेतले ताब्यात; घटनेचा व्हिडिओ समोर

नंदी रोडवर जमावाचा पोलिसांवर हल्ला

अखेर नंदी रोड परिसरात पोलीस पथकाने जब्बार याला गाठून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कारवाई सुरू असतानाच परिसरातील जमाव घटनास्थळी जमा झाला. जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळच असलेल्या आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील हे सुधाकर शेंडगे, संदीप कढरे, मकसूद पठाण तसेच महिला पोलीस कर्मचारी जयश्री मोरे आणि सुरेखा साबळे यांच्यासह अतिरिक्त पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाल्यानंतरही जब्बारचे नातेवाईक आणि समर्थक अधिक आक्रमक झाले. त्यांनी पोलीस पथकाला धक्काबुक्की करीत कारवाईत अडथळा निर्माण केला. याच गोंधळादरम्यान जब्बार याने छातीत दुखत असल्याचे सांगून प्रकृती अस्वस्थ असल्याचा बहाणा केला. या परिस्थितीचा फायदा घेत जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेले.

Police Assault
Dhule Crime | साक्रीत पशुवैद्यकीय विभागाच्या जुन्या इमारतीत महिलेचा खून

पोलीस निरीक्षकासह सहा कर्मचारी जखमी

या हल्ल्यात पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, जयश्री मोरे आणि सुरेखा साबळे हे सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

११ जणांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कर्मचारी गौतम सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात जब्बारशहा गुलाब शहा फकीर, तमन्ना गुलाब शहा, मेहराज बानू, हलीमा बी शाह, नजमा बी इस्माईल शहा, परविन रफिक शहा, आदिल गुलाब शहा, जाकीर शहा, इकबाल गुलाब शहा, अमन रफिक शहा आणि मुजम्मिल शहा यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Assault
Dhule Crime | नागपूर-सुरत महामार्गावर डिझेलचा काळाबाजार; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच जमावाच्या हल्ल्याचा सामना करावा लागल्याने धुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या ताब्यातून आरोपीला पळवून नेण्याच्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. फरार आरोपीचा शोध आणि या प्रकरणातील पुढील पोलीस कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.