Dhule Crime | नागपूर-सुरत महामार्गावर डिझेलचा काळाबाजार; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

काका ढाब्याजवळ टँकरमधून डिझेल काढताना कारवाई; दोघांना अटक, पाच जणांविरुद्ध गुन्हा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Nagpur Surat Highway Illegal Diesel Racket

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर हॉटेलजवळील पत्र्याच्या शेडमध्ये टँकरमधून डिझेल काढून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काका ढाब्याजवळ झालेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन डिझेल टँकर आणि इतर साहित्य असा सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर-सुरत महामार्गावर हॉटेल व्यवसायाच्या आडून टँकरमधील इंधनाची अनधिकृत विक्री करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. यासंदर्भात धुळे तालुका, साक्रीसह अन्य पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.

Crime News
Dhule Crime : साक्रीत बनावट दारूचा साठा जप्त; पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दरम्यान, महामार्गावरील काका ढाब्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेड परिसरात टँकरमधून डिझेल काढले जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी घटनास्थळी दोन टँकर उभे असल्याचे आणि त्यातून डिझेल काढले जात असल्याचे निदर्शनास आले.

४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३० लाख रुपये किमतीचा डिझेलने भरलेला जीजे १५ एटी ३२९९ क्रमांकाचा टँकर, सुमारे १७ लाख ४० हजार रुपये किमतीचा दुसरा टँकर तसेच डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दोघांना अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पोलिस उपनिरीक्षक अशोक वळवी यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चंद्रप्रकाश वीरेंद्रकुमार मिश्रा, मोहम्मद अब्बास अल्ताफ, धुळे येथील मिरच्या मारुती चौकातील सचिन जीवन मुर्तडकर, राजस्थानमधील सलीम युसुफ खान आणि टँकरचालक अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Dhule Crime : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीत लाचखोरीची वाळवी; 1500 रुपये मागणाऱ्या वनरक्षकाला अटक

या प्रकरणी चंद्रप्रकाश मिश्रा आणि मोहम्मद अब्बास अल्ताफ या दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ३, ७ व ८ तसेच मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ सप्लाय, डिस्ट्रीब्युशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस) ऑर्डर, २००५ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news