

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर जवळील लामकानी येथे कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नगाव (ता. धुळे) येथील कर्मचाऱ्याची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यवर्ती बँकेचे नगाव येथील कर्मचारी कृष्णा खुशाल वाघ यांची (रा. प्लॉट क्रमांक १५, श्रीगुरू कॉलनी, वलवाडी शिवार, देवपूर, धुळे) कॉलनीत लावरी पक्षी विक्रीसाठी येणाऱ्या सारिका आकेश पवार आणि तिचा पती आकेश कामसिंग पवार (दोघेही रा. जामदे, ता. साक्री) यांच्याशी तीन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत सारिकाने आपल्याला पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगून पाच लाख रुपयांच्या बदल्यात सोने देण्याचे आमिष वाघ यांना दाखविले.
सुरुवातीला संशयितांनी दिलेले सोन्याचे नमुने तक्रारदाराने सोनाराकडून तपासून घेतले असता, ते खरे निघाले. त्यानंतर २४ फेब्रुवारीला लामकानी व्यवहार ठरला. तक्रारदाराने मुलांच्या मदतीने एक बँक आणि एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून पाच लाख रुपये संशयिताला दिले. त्या बदल्यात त्यांना सोन्याचे दागिने आणि लगड मिळाली.
दरम्यान, घरी आल्यावर दागिन्यांची सोनाराकडे पडताळणी केली असता, ते सोने नसून पितळ असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वाघ यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाईल बंद होते. वारंवार पैसे परत देण्याची टाळाटाळ केल्याने अखेर त्यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक प्रशांत ताकटे तपास करीत आहेत.