

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आठ अभियंत्यांनी बनावट पदविका प्रमाणपत्र जोडून पदोन्नती मिळवली असून यापैकी तीन कनिष्ठ अभियंत्यांवर लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वच अभियंत्याची विभागीय चौकशी होणार असून ती प्रस्तावित आहे तिचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अभियंत्यांची नावे एन. एस. स्वामी (पंचायत समिती देवणी) बी. एस. सूर्यवंशी ,श्रीमती पी.पी. पाटील (बांधकाम उपविभाग जि.प.लातूर) अशी आहेत.
2011 साली लातूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील अनेक अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली होती. याबाबत अनेक तक्रारी आल्याने ही पदोन्नती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी हे प्रकरण गांर्भीयाने घेत त्यांच्याच अध्यतेखाली समिती गठीत करुन याची चौकशी केली होती. त्यात या पदोन्नतील बिंग बाहेर पडले . एस. के ढोबळे, एन. के. फटाले व एम.एम शेख. यांना पदावनत करण्य्ात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.
अशी झाली पोलखोल
पदोन्नतीबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी जोडलेल्या पदविका प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे ठरले. त्यांनी जोडलेली प्रमाणपत्रे संबधीत विद्यापीठांना पाठवून ती त्याच विद्यापीठाची आहेत का याची खात्री केली व इथेच या प्रकरणाचे बिंग फुटले. या प्रमापत्रे संबंधित विद्यापीठाची नाहीत ते बनावट आहेत असे फेरतपासणीत आढळले विद्यापीठाने तसा अहवालही दिला अन् कारवाई झाली.