धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड

File Photo
File Photo

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पोलीस दलाच्या खांद्यास खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना काम दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या तालुका समादेशकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना बंदोबस्ताचे काम देण्यातही भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

गृहरक्षक दलाच्या जवानांना काम देण्याच्या मोबदल्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत होत्या. मात्र त्याला पुष्टी मिळत नव्हती. अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळ्याच्या पथकाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार लाचखोर समादेशक अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. मूळ शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथे राहणाऱ्या गृह रक्षक दलाच्या जवानाने या संदर्भात तक्रार दिल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या गृह रक्षक दलाच्या जवानाला समादेशक अधिकारी दगडू गणपत कुंभार याने लाचेची मागणी केली. शिंदखेडा येथे गृहरक्षक दलात नेमणुकीवर असणाऱ्या या तक्रारदाराला दहीहंडी तसेच मोहरमच्या कालावधीमध्ये समादेशक कुंभार याने पोलीस ठाण्यामध्ये बंदोबस्तासाठी नेमणूक केली होती. या मोबदल्यात या तक्रारदार जवानाकडून 2500 रुपयांच्या लाचेची मागणी झाली होती. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे सहकारी होमगार्ड यांना देखील नवरात्रोत्सवात बंदोबस्तात नेमणूक केल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाली होती. मात्र या संदर्भात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने हातनूर येथे राहणाऱ्या या गृहरक्षक दलाच्या जवानाने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या पथकाने आरोपी दगडू गणपत कुंभार याच्याकडे तक्रारदारासह पाठवले. यावेळी तडजोडीअंती 4500 देण्याचे ठरले. त्यानुसार धुळ्याचे उपाधीक्षक अनिल बडगुजर तसेच पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण आणि पथकाने शिंदखेडा तालुक्यातील वीरदेल येथील शेतातील खळ्यात सापळा लावला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदार याच्याकडून पैसे स्वीकारत असताना दगडू कुंभार याला रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news