‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आम्ही तुमच्या सोबत : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आम्ही तुमच्या सोबत : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
Published on
Updated on

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबाबत माफी मागितली; मात्र शाब्दिक माफी मागून चालणार नाही, तर तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीचे दहन करा, आम्ही तुमच्या सोबत येऊ, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी येथे आयोजित धम्म मेळाव्यात केले.  दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभेच्या वतीने शनिवार (दि.15) पिंपरी येथील एचए मैदानात धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते.

कार्यक्रमात अंजली आंबेडकर, अशोक सोनोने, महासभेचे पिंपरी- चिंचवड अध्यक्ष डी. व्ही. सुरवसे, रेखा ठाकूर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, दिशा पिंकी शेख, भाऊसाहेब डोळस आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे हा देश गुलाम होता. त्यामुळे आमचा वाद हा धर्माशी नाही, मनुवादी व्यवस्थेशी आहे; मात्र आता देशात होत असलेल्या दीक्षांतरामुळे मनुस्मृती मानणार्‍या वर्गामध्ये वादळ उठले आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर तत्कालीन सरसंघचालक म्हणाले होते की, आम्ही पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आणू; मात्र देशात सुरू असलेले धम्म मेळावे पाहता आताचे सरसंघचालक घाबरले आहेत. ते आता समांतराची भाषा बोलत आहेत. 75 वर्षांनंतर हा बदल झाला आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

आताच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. चोरांच्या हातात अर्थव्यवस्थेची तिजोरी गेली आहे. येत्या तीस दिवसांत अर्थव्यवस्था डगमगणार आहे, अशी रिझर्व्ह बँकेने भीती व्यक्त केली आहे. परदेशी भांडवलदारांच्या हाती देशाची अर्थव्यवस्था जात आहे. देशातील ईडी, 'एनआयए'चा वापर चुकीच्या मार्गाने होत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले; तसेच आताच्या लडखडत चालणार्‍या सरकारला आपल्याला टेकू द्यावा लागणार आहे.

भाजप सोडून इतरांच्या मदतीस तयार
आताच्या परिस्थितीत राजकीय पक्षांनी हिंमत दाखविण्याची गरज आहे. किती जणांना जेलमध्ये टाकणार आहात? आता चोर वाढले आहेत. मागच्या आठ वर्षांत लाखो भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. त्याचा कोण विचार करणार, आताच्या लडखडणार्‍या सरकारला आपल्यालाच टेकू द्यावा लागणार आहे. भाजप सोडून इतर पक्षाला मदत करण्यासाठी आपण तयार आहोत. ज्या पक्षाला आमची गरज वाटत असेल, त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news