पालघर : सेल्फीच्या नादात चार महिला बुडाल्या … दोघींचा मृत्यू, दोघींना वाचवण्यात यश! | पुढारी

पालघर : सेल्फीच्या नादात चार महिला बुडाल्या ... दोघींचा मृत्यू, दोघींना वाचवण्यात यश!

नालासोपारा / खानिवडे ; पुढारी वृत्तसेवा :  वैतरणा खाडीजवळील जेट्टीवर सेल्फी काढण्याच्या नादात एकाच घरातील 4 महिला समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी घडली. यातील दोघींना सुखरूप वाचविण्यात स्थानिकांना यश आले असून दोघींचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

वैतरणा पूर्व फणस पाडा गाव येथे जेटीवर सेल्फी फोटो काढत असताना धक्क्यावर मळी चिखलाच्या पाण्यात दोघी घसरून पडल्या असता दोघी जणी त्यांना वाचवायला गेल्या होत्या, परंतु गावकर्‍यांच्या मदतीने दोघी वाचल्या मात्र लीला धमसिंग दासना (वय 24) व सत्तू घासी दासाना 14 वर्ष यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच घरातील
दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सत्तू हिचा मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढला असून लीला यांचा मृतदेह वसई- विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून बचावलेल्या दोघी घरी निघून गेल्याने त्यांची नावे समजू शकली नसल्याचे अग्निशमनदलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले.

Back to top button