धुळे : जिल्ह्यातील 17 ठिकाणी कारवाई; 91 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

धुळे www.pudhari.news
धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात अंमली पदार्थ विरोधात 17 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण 91 लाख 94 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 32 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक यांच्या दालनात जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्ह्यात अफू किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता महसूल आणि कृषी विभागाने घ्यावी. अंमली पदार्थांच्या दुष्परिणांमाची माहिती देण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम. डी. शेवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे,  डॉ. हर्षवर्धन चित्तम, केंद्रीय विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त के. डी. भामरे, स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे किरण देशमुख, टपाल विभागाचे किरण साळुंखे आदी उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे सेवन व वापराबाबत परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाहीची आवश्यकता आहे. त्यानुसार अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालणे आणि क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थांबाबतची समस्या हाताळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईचा दरमहा आढावा घेण्यात येईल. कुरीयर, टपाल किंवा अन्य माध्यमातून या पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. तसेच टपाल विभागाने कुरीयरवाल्यांना सूचना द्याव्यात. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याची माहिती समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल.

ड्रग डिटेक्शन कीट व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता निश्चित करणे, पोलिस, एनसीबी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवायांची माहिती संकलित करून त्यबाबतचा डाटाबेस तयार करण्यात येईल. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही. याची दक्षता घेतानाच जे कारखाने बंद आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच एनडीपीएसअंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या तपासी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news