चिपळूणचे जलतरणपटू पुरात धावणार मदतीला | पुढारी

चिपळूणचे जलतरणपटू पुरात धावणार मदतीला

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात 22 जुलै 2021 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत येथील नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या आपत्तीविरोधात लढण्यासाठी मदत कार्यासाठी धावणार्‍या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांची पात्रता निवड चाचणी शनिवारी झाली. यामध्ये 37 जलतरणपटूंनी ही चाचणी शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या डोहात पूर्ण केली. त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली आहे. त्यामुळे मदतीला जलतरणपटू धावणार आहेत.

गतवर्षी महापुराने चिपळूण शहरात हाहा:कार उडाला होता. बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य व वित्त हानी झाली. त्यानंतर येथील प्रशासनासह नगर पालिका व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच अ‍ॅलर्ट झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने पावसाळी पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.

या संस्थेमार्फत आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण 13 ते 15 मे दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, व्यापारी, राजकीय पक्ष यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणापूर्वी त्यात सहभाग घेणार्‍या प्रशिक्षणार्थींची पात्रता निवड चाचणी घेण्यात आली. शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून या निवड चाचणीला सुरुवात झाली. यावेळी शहरातील मुरादपूर, शंकरवाडी, पाग व बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणार्‍या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी संबंधित तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच 13 ते 15 मे दरम्यान होणार्‍या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करत या संस्थेचे प्रमाणपत्र जगाच्या पाठीवर कुठेही उपयोगी पडेल. तेव्हा या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, वैभव निवाते, राजू खातू, महेश शिंदे, बाळकृष्ण पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात काय शिकायला मिळणार

या शिबिरात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींमधून पोहता येणारे व पोहता न येणारे असे दोन गट तयार केले जाणार आहेत. तसेच या शिबिरात पूर आपत्तीला कसे तोंड द्यावे, त्याची तयारी कशी करावी, स्वत:चा जीव व दुसर्‍याचा जीव कसा वाचवावा, लाईफ सेव्हिंग इक्वीपमेंटचा वापर कसा करावा, वित्तहानी कशी टाळावी याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Back to top button