जळगाव: पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्हा सहकारी दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली असताना कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत दूधसंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी मंगळवारी (दि. २) पदभार घेत ६ लाखांची देयके अदा केली. याविरोधात प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक आ. मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. प्रशासकीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. जिल्हा दूधसंघात कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार झाल्याच्या मुद्यावरून राज्य शासनाने चौकशी समिती गठीत करून संघाची सूत्रे प्रशासकांच्या हाती दिली आहेत. यानंतर दूधसंघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक घेऊन दूधदेयकांना मंजुरी दिली. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या जवळचे अरविंद देशमुख यांनी मंदाकिनी खडसे व खडसे गटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर दूधसंघाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेत मोठा धक्काच दिला आहे.
दोन दिवसांत ऑडिटचे आदेश
प्रशासकीय दूधसंघातील अतिरिक्त दोनशे कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. याबाबत ऑडिट करून दोन दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे आदेश मुख्य प्रशासकांनी दिले आहेत. तत्कालीन कार्यकारी संचालक मनोज लिमये हे नॉट रिचेबल असल्याने शैलेश मोरखेडी यांना प्रशासक मंडळाकडून तातडीने कार्यकारी संचालकपदाच्या जबाबदारीचे आदेश दिले आहेत.
या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई…
दूधसंघात अतिरिक्त कर्मचारी भरती करण्यात आली आहे. बहुतेक कर्मचारी कामावर न येताच पगार घेतात. तर काही कर्मचारी वैयक्तिक कुणाच्या तरी घरी काम करतात पगार मात्र दूधसंघाचा घेतात. अशा अतिरिक्त तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी मागवली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत ऑडिट करण्याचे आदेश मुख्य प्रशासकांनी दिल्याची माहिती प्रशासक मंडळातील अजय भोळे यांनी दिली.
पाचोरा दूध केंद्रात पाहणी…
प्रशासक मंडळाच्या सदस्यांनी पाचोरा येथील दूध केंद्रात गुरुवारी (दि. ४) भेट देऊन पाहणी केली. या पथकात अरविंद देशमुख, अजय भोळे, अमोल शिंदे यांचा समावेश होता. या पथकाने दररोज होणारे दूध संकलन तसेच प्रक्रियेचा आढावा घेतला. तर दिवसाला ५ हजार लिटर दूध संकलन वाढविण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती अरविंद देशमुख यांनी दिली.