‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई

पंचवटी : प्लास्टिक वापरणार्‍या दुकानदारांवर कारवाई करताना संजय दराडे, संजीव रेदासनी आदी अधिकारी व कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : प्लास्टिक वापरणार्‍या दुकानदारांवर कारवाई करताना संजय दराडे, संजीव रेदासनी आदी अधिकारी व कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना प्लास्टिकसह कॅरिबॅगचा अतिवापर होऊ नये, यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पंचवटी परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदारांकडून तब्बल 309 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर 25 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाकडून प्लास्टिक वापरणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संजीव रेदासनी, नितीन चौधरी, संतोष मोहरे यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली. पंचवटी कारंजा, पेठ फाटा, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या ठिकाणी विभागीय स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, दुर्गादास माळेकर, किरण मारू, दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत काही दुकानदार प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅग, प्लास्टिक डिश, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक पत्रावळ्या वापर करताना आढळले. अशा पाच व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 25 हजार रुपयांचा दंड तसेच, 80 किलो प्लास्टिक व 229 किलो प्लास्टिक पत्रावळ्या जप्त करण्यात आल्या.

सं'युक्त' कारवाईचा 'अर्थ' काय?
घनकचरा व्यवस्थापन विभाग, पंचवटी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने प्लास्टिकचा वापर करणारे व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍यांविरोधात प्रथमच संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. वर्षभर केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागच अशा प्रकारची कारवाई करत असते. मात्र, ऐन दिवाळीच्या सणामध्ये राबविण्यात आलेल्या या सं'युक्त' (सण युक्त ) कारवाईचा 'अर्थ' काय, याबाबतची चर्चा दुकादारांमध्ये रंगली आहे.

प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची ही मोहीम यापुढेदेखील सुरूच राहणार आहे. नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिक वापरू नये, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्याचेदेखील उपक्रम राबविले जात आहे. -संजय दराडे ,  स्वच्छता निरीक्षक, पंचवटी विभागीय कार्यालय.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news